आमच्याकडच्या खासदार, आमदारांची संख्या आॅक्टोबर मध्ये कळेल – सुनील तटकरे
पुणे, ता. २४ ः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असला नाही शरद पवारांच्या कडे किती आमदार खासदार आणि अजित पवारांकडे कधी किती याबाबत गेल्या तीन चार महिन्यात स्पष्टता आलेली नाही मात्र आता हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यात बोलताना भाष्य केले.”केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ६ ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबाबतची सुनावणी आहे. त्यावेळी आमच्याकडे किती खासदार, किती आमदार नेमके कोणाकडे आहेत, हे चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर नागालॅंड, झारखंड येथील पक्षाच्या आमदार, खासदारांची नेमकी काय भूमिका आहे, हे देखील कळेल,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर असलेल्या सुनील तटकरे यांनी रविवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, तटकरे यांनी अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा, भोलानाथ मित्र मंडळ, राजाराम मित्र मंडळ, कोथरूड महोत्सव या ठिकाणी मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आगामी लोकसभा निवडणूक तुमचा गट लढणार आहे का ? शिरूरची जागा तुम्ही लढणार आहात का ? या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले, ” बारामती, शिरूर, रायगड, सातारा यांच्यासह महाराष्ट्रात महायुतीसमवेत आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत, त्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व अन्य सर्व सहकारी पहिल्यांदा पक्षांतर्गत एकत्र बसून निर्णय घेऊ. त्यानंतर भाजप, शिवसेना व इतर मित्र पक्षांसमवेत बसून नेमक्या कुठल्या जागा लढवायच्या, त्याविषयी ठरविणार आहोत. ज्या जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष “एनडीए’मधून लढवेल, त्या जागांवरील सर्व उमेदवारांबाबत अजित पवार हेच ठरवतील.”
पार्थ पवार निवडणूक लढविणार आहे का ? याबाबत तटकरे म्हणाले, ” पार्थ पवार यांच्याविषयी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही महाराष्ट्रासाठी निर्धार करून काम करण्यासाठी बाहेर पडलो आहोत. तो निर्धार जनतेपर्यंत पोचवून अधिक मजबूत व्हावा, “एनडीए’ अधिक मजबूत करणे, हाच आमचा हेतू असून तो आम्ही लोकांपर्यंत नेत आहोत. जेव्हा मतदारसंघांचे लोकसभानिहाय वाटप होईल, त्यावेळी उमेदवारांबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा विचार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल”