पाटण्यातील बैठक मोदी हटविसाठी नाही तर परिवार बचावसाठी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, २३ जून २०२३: पाटण्यात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला त्यांनी ‘मोदी हटाव’ असं नाव दिलं असलं तरी ती ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बिहारच्या पाटणा शहरात भारतीय जनता पार्टीविरोधात सर्व विरोधक एकत्र आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधत आहेत. देशभरातील १५ हून अधिक पक्षांचे नेते या बैठकीला गेले आहेत. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीवर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार टीका सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही परिवार बचाव बैठक आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाटण्यात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला त्यांनी ‘मोदी हटाव’ असं नाव दिलं असलं तरी ती ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे. देशातल्या सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्र आल्या आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कशी राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत, म्हणूनच ते लोक एकत्र आले आहेत. यांच्यासाठी राज्य चालवणं हा एक धंदा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीसाठी, नरेंद्र मोदींसाठी ती सेवा आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ ला या सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन पाहिलं. परंतु जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षा जास्त ताकदीने जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या पाठीशी उभी राहील. विरोधकांनी असे कितीही मेळावे घेतले तरीदेखील त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सातत्याने महबुबा मुफ्तीच्या नावाने भाजपाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे स्वतः महबुबा मुफ्तींसोबत चाललेच होते आता ते त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. सत्तेसाठी आणि परिवार वाचवण्यासाठी आपली परिवारवादी पार्टी वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करण्यासठी ते तयार आहेत.