आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची दिशा ठरली
पुणे, ७ जानेवारी २०२३ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत प्रचाराचा ‘अजेंडा‘ निश्चित करण्यात आला. केंद्र सरकारच्या योजना घरोघरी पोचविण्याबरोबरच राम मंदिर, ‘सुपर वॉरिअर्स’च्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
राष्टीय संघटक बी.एल. संतोष यांच्या उपस्थित पुण्यात रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकीत राज्यातून ४५ जागांचे उद्दीष्ठ पक्षाकडून ठेवण्यात आले आहे. ते गाठण्यासाठी
पक्षाने ठरवून दिलेले उपक्रमांवर भर देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि हाच प्रचाराचा अंजेडा घेऊन आगामी निवडणुकीत मतदारांपुढे जाण्याचा निर्धार करण्यात आला.
लोकसभा निवडणूका दोन महिन्यांवर येऊ ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बी.एल संतोष यांच्यासह राष्ट्रीय सह संघटक मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासह राज्यातील पक्षाचे आणि संघटनेतील सत्तर प्रमुख नेते या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. बैठकीला उपस्थित असणाऱ्यांचे मोबाईल फोनदेखील काढून घेण्यात आले होते. तर, प्रसारमाध्यमांनाही परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
लोकसभा आणि विधान सभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाकडून सध्या राज्यभरात राम जन्मभूमी, ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्यासह विविध प्रकाराचे सात उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या शिवाय वर्षभर राबविण्याच्या कार्यक्रमांचा दिननिहाय अजेंडा यापूर्वीच निश्चित करण्यात आला आहे. त्या सर्व उपक्रमांचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. तर, सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून ‘मेरा बुथ सबसे मजबुत’ योजनेतून पक्षाच्या मतांची टक्केवारी ५१ पर्यंत वाढविणे, नमो ॲप, सरल ॲप, मन की बात या माध्यमातून अधिकाधिक मतदारांना जोडणे, नवीन मतदार नोंदणी यावर भर देणे आदी उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याच्या निर्णय घेण्यात आल्या. आगामी निवडणुकीत भाजपची प्रचाराची रणनीती या बैठकीत निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महायुतीत नव्याने दाखल झालेल्या घटक पक्षांच्या मदतीने जागा मिळण्याचे उद्दीष्ठ गाठण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल, विजयासाठी कोणत्या गोष्टींवर कराव्या लागतील, घटक पक्षांपेक्षा पक्षाची ताकद कशी वाढले, आदी गोष्टींवर देखील या बैठकीत मंथन झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदार संघनिहाय यावेळी आढावा घेण्यात आला. फडणवीस, बावनकुळे, शिवप्रताप आणि बी.एल संतोष यांनी मार्गदर्शन केले.