भाजप सोबत न जाण्याची अट ठाकरे, पवारांकडून अमान्य: प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

मुंबई, १६ मे २०२४: लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत युतीच्या चर्चा करत होतो. यावेळी स्वतः संजय राऊत यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आम्हाला सांगितलं की, पुढील पाच वर्ष भाजपसोबत न जाण्याची अट आणि लेखी देऊ शकत नाही. कारण आम्ही अद्यापही भाजपची दारं बंद केलेले नाहीत. असाच स्वर ठाकरे गटासह राष्ट्रवादीचा होता. असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आंबेडकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे. अगोदर देखील प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत खळबळजनक दावा केला होता. चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली होती. असं ते म्हणाले होते. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळण्याची शक्यता असल्याने अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये आंबेडकर यांनी जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु असताना केलेल्या गोष्टींचा खुलासा मुलाखतीत केला आहे.

आंबेडकर म्हणाले, ‘‘ महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही काही अटी ठेवल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत पुढील पाच वर्ष न जाण्याची अट ठाकरे गट आणि स्वतः संजय राऊत यांनी मान्य केली नव्हती. यावेळी स्वतः संजय राऊत यांनी व शरद पवार यांनी ती अमान्य केल होती. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कशासाठी फोन केला असावा असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नावर आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.