ठाकरे, पवारांनी सम्रुद्धी महामार्गाला विरोध केला पण लोकांनी त्यांचे ऐकले नाही – देवेंद्र फडणवीस यांचा टोला

अहमदनगर, २६ मे २०२३: संसदेच्या नव्या इमारतीचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यास ठाकरे गटाच नेते उद्‍धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विरोध केलेला असतानाच हीच टायमिंग साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांनी सम्रुद्धी महामार्गाच्या कामाला विरोध केला होता, पण तेथील लोकांनी त्यांचे ऐकले नाही, राज्य सरकाराला जमिनी दिल्या, त्याबदल्यात त्यांना चांगला मोबदला दिला आहे असे सांगत टोला लागावला.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी ( २६ मे ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झालं. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपगावातील शेतकऱ्यांचं आभार मानले आहेत.
फडणवीस म्हणाले, “राज्याचा विकास करायचा असेल, तर मागास भाग मुंबई आणि बंदरला जोडणं आवश्यक होतं. समृद्धी महामार्ग अनेकांना केवळ स्वप्न आणि घोषणा वाटायचा. पण, मला आणि एकनाथ शिंदेंना विश्वास होता, की महामार्गाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आज ते होताना दिसत आहे. ‘अंदाज कुछ अलग है, मेरे सोचनेका, सबको मंजिलो का शौक हे, और मुझे रास्ते बनाने का,’” अशी शायरी म्हणून दाखवली.

“समृद्धी महामार्गासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी विधीमंडळात कायदा केला. न भुतो असा मोबदला दिला. पण, अनेक लोकांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेऊन हा महामार्ग होऊ देणार नाही, असं सांगितलं. शरद पवार यांनी नगर येथे बैठक घेत, हा महामार्ग करणे शक्य नसल्याचं सांगितले होते. पण ज्या गावात जाऊन त्यांनी विरोध केला, तेथील लोकांनी स्वत:हून जमीन ताब्यात दिल्या. या महामार्गामुळे राज्यातील पंधरा जिल्ह्यांचं भाग्य समृद्धी महामार्ग बदलणार आहे. आधी मुंबई आणि पुण्याचा विकास व्हायचा. पण, आता गोंदियापर्यंत विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगधंदे, कृषी समृद्धी या सर्व गोष्टी महामार्गामुळे तयार करू शकणार आहोत. समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकर बसवण्यात यावी, अशी विनंती करतो. महामार्गावर १२० ची किमी वेग मर्यादा असली, तरी सर्व गाड्या या वेगात चालण्यायोग्य नाहीत. त्यामुळे अशा गाड्या घेऊन वेगाने जाऊ तर अपघात होऊ शकतो. महामार्ग जरी वेगवान असला, तरी आपलं जीवन त्यापेक्षा मुल्यवान आहे. म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे,” असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप