बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे, परभणीतून मी जिंकणार: महादेव जानकरांनी जाहीर केला निकाल

परभणी, २२ मे २०२४ : राज्यातील ४८ मतदारसंघातील लोकसभा निवडणुकांसाठी ५ व्या टप्प्यात मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. त्यामुळे, राज्यातील ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता गावागावात ४ जूनच्या निकालाचीच प्रतिक्षा आहे. गावखेड्यात, चौकाचौकात, प्रवासात आणि पार्ट्यांमध्येही ४ जूनचीच चर्चा होत आहे. गावपातळीवर कोणता उमेदवार निवडून येणार यावरुन मोठ्या पैजाही लागल्याचं दिसून येत आहे. तर, महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेतेही आपल्याच जागा सर्वाधिक येणार असल्याचा दावा करत आहेत. त्यातच, राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती आणि बीड लोकसभा मतदारसंघाबाबत रासपचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाकीत केलं आहे. तर, परभणी लोकसभा मतदारसंघातून आपलाच विजय होणार असल्याचा दावाही महादेव जानकर यांनी केला आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये मी ५५ सभा घेतल्या. त्यावेळी, राज्यातील निवडणुकांमध्ये मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसली. मात्र, तरीसुद्धा महायुतीच्या ४२ जागा निवडून येणार आहेत, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे, बीड आणि परभणीमध्ये ओबीसी व मराठा वाद जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. महाविकास आघाडीने खतपाणी घालून हा वाद केल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे. जानकर यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांच्याकडे बोट दाखवले आहे. बीड आणि परभणीत सर्वात जास्त कोण फिरलं हेही बघायला पाहिजे, कुठल्याही एका जातीवर राजकारण करणं हे चुकीचं आहे, असे जानकर यांनी म्हटले. मात्र, काहीही झालं तरी बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीतून मीच निवडून येणार असल्याचा दावाही जानकरांनी केलाय.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार, बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून मी निवडून येणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे महादेव जानकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, महायुतीला राज्यात ४२ जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे, आता महादेव जानकरांचा हा विश्वास जिंकतो की त्यांचा हा आत्मविश्वास अतिशयोक्ती ठरतो हे ४ जून रोजीच कळणार आहे. दरम्यान, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली असून महादेव जानकर यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारही केला होता. तर, पंकजा मुंडेंना ते आपली बहिण मानतात.

दरम्यान, बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत जातीय राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं. बीडमध्ये मुंडे बहिण-भावाने थेट जातीय राजकारणावर प्रहार केला. बीडमध्ये यापूर्वी कधीच असं जातीय राजकारण झालं नसल्याचंही त्यांनी आपल्या जाहीर भाषणातून सांगितलं. मात्र, मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थान असल्याने बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद दिसून आला. त्यातच, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगण सोनवणे हे मराठा समाजाचे असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी असे ध्रुवीकरणही येथे पाहायला मिळाले. तर, परभणीतही शिवसेनेचे संजय बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्या लढतीतही जातीय समीकरण दिसून आले.