सुनेत्रा पवार यांनी स्वतः जाहीर केली स्वतःची बारामतीतून उमेदवारी

बारामती, २४ फेब्रुवारी २०२४ : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागली आहे. पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. परंतु निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्याचे लक्ष पुणे जिल्ह्याकडे लागले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होती. परंतु आता स्वत: सुनेत्रा यांनी यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार
बारामतीमधील कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामतीच्या विकासविषयी तळागाळातील प्रत्येक जण साक्षीदार आहे. तुम्ही सर्वांनी अजित दादांना नेहमी प्रेम दिले आहे. त्या प्रेमाचे उतराई होण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु. बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील. तुम्ही मला एक संधी द्याल, अशी आशा मी बाळगते. सुनेत्रा पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे बारामती लोकसभेच्या त्या उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गेल्या दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज दुसऱ्या दिवशी विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन त्या करणार आहेत. शुक्रवारी सुनेत्रा पवार यांनी विश्वकर्मा जयंतीला देखील उपस्थिती लावली होती. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे. बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदार संघाचे दौरे करत आहेत. त्यांनी संत गाडगे महाराज आणि संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बारामती दौऱ्याची सुरुवात केली. तसेच स्वच्छता केली. सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या, मी खासदार होण्याच्या दोन वर्षापूर्वीपासून मतदार संघाचे दौरे करत होते. संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या बारामती दौऱ्यांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.