कुलगुरूंच्या भांडे खरेदी विरोधात प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन

पुणे, २७/०९/२०२२: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या घरातील भांडे व संसारोपयोगी साहित्याच्या खरेदी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील भ्रष्ट कारभार, बेकायदेशीर पद्धतीने केलेली भांडी, पडदे व इतर संसारोपयोगी साहित्याची खरेदी याचा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेशआबनावे, अक्षय जैन, उमेश पवार, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ आमराळे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, महासचिव अनिकेत नवले, रोहन सुरवसे पाटील आदी उपस्थित होते.

कुलगुरूंच्या संसारोपयोगी वस्तू विद्यापीठाच्या पैशातून खरेदी केल्या आहेत. घरातील कुकर, मिक्सर, डायनिंग टेबल, पडदे, सोफासेट अशा छोट्या-मोठ्या ९२ वस्तू खरेदीसाठी विद्यापीठाच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. तसेच विद्यापीठाच्या कारभाराविरुद्ध माहिती अधिकारात माहिती मागून दिली जात नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आणि कुलगुरूंच्या प्रभारी कुलगुरूंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.