“इंग्रजी बोलतो म्हणजे खूप शहाणा झालो असं नाही” – सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची बोचरी टीका
अहमदनगर, २६ एप्रिल २०२४: अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजी भाषेच्या मुद्द्यावरून आव्हान दिले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत सुजय विखेंवर बोचरी टीका केली आहे.
मी इंग्रजीतून जे भाषण केले, ते निलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही, असे आव्हान डॉ.सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना दिले होते. यानंतर निलेश लंकेंनी सुजय विखेंना प्रत्युत्तर दिले होते. माझ्या समोरच्या उमेदवाराने इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.
आता शरद पवार यांनी सुजय विखेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मी इंग्रजी बोलतो म्हणजे मी खूप शहाणा झालो असं नाही, तुमचं इंग्रजी तुम्हाला लाखलाभ असो, असे बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच, नगरमध्ये मंडळी सांगतात ५० वर्ष आम्ही लोकांची सेवा करतो. पण त्यांच्या पहिल्या पिढीने काम केलं नंतरच्या पिढीने काय केलं? अशी टीका त्यांनी यावेळी विखे पाटलांवर केली आहे. राहुरी कारखान्यावर राज्यभरातील मंत्रिमंडळातील अनेक लोक येऊन गेले. कारण सहकारातील उत्तम कारखाना कसा आहे तो पाहण्यासाठी मोठे नेते यायचे पण याच कारखान्याची विखेंनी काय वाट लावली हे मी सांगू इच्छित नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदींची गॅरंटी काही कामाची नाही
ज्यांच्या हातात दहा वर्षे सत्ता होती. त्यांनी देशासाठी काय केलं त्याचा हिशोब मागण्याची ही निवडणूक आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातील नरेंद्र मोदींची जुनी भाषणं मी ऐकली. त्यांचा मुद्दा केवळ महागाईचा होता. मोदी म्हणाले होते की, मला सत्ता द्या मी ५० टक्के महागाई कमी करेन. पण आज देशातील महागाईची काय स्थिती आहे. देशात बेकारीचा प्रश्न मोठा आहे. ते म्हणतात मोदींची गॅरंटी पण त्यांची गॅरंटी काही कामाची नाही, असा हल्लाबोल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.