अंतरवलीत बैठकींचा सापाटा: जरांगे म्हणाले, मॅनेज होणार नाही
जालना, १९ ऑक्टोबर २०२४ ः विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जरांगेंनी आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता निवडणुकीत लढायचं की पाडायचं यासाठी अंतिम फैसला उद्या (दि.२०) अंतरवली सराटीत आयोजित बैठकीत घेतला जाणार आहे. त्यापूर्वी अंतरवाली सराटीत घडामोडींना वेग आला असून, माझ्या विरोधत कॅम्पेनिंग सुरू असल्याचे मनोज जरांगेंनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले की, सध्या माझ्या विरोधात कॅम्पेनिंग सुरू आहे. पण वेळ आल्यानंतर सर्वच गोष्टींची चिरफाड करेल असा इशारा जरांगेंनी दिला आहे. मी पैसा आणि पदांवर फुटणारा नाही असेही जरांगेंनी स्पष्ट केले. माझ्याविरोधात कॅम्पेनिंगसाठी ग्रुप करण्यात आल्याचे जरांगे म्हणाले. पण असं करून काही होणार नाही. वेळ आल्यावर या सर्व गोष्टीची चिरफाड होईल असा थेट इशारा जरांगेंनी दिला.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, वेळ आली तर समाजासाठी मरेल सरकारकडे आणि विरोधकांकडे शेवटच अस्त्र तेच आहे. मला एकतर मारून टाकावं लागेल किंवा मी मरेल पण मी काही पैशांवर आणि पदांवर फुटू शकत नाही. माझ्याविरोधात जवळच्यांना जर तुम्ही डाग लावण्याचा प्रयत्न केला असेल तर, घेणार आणि देणारा दोघेही संपणार असे जरांगे म्हणाले.
उद्या पाडायचं की लढायचं ठरणार
अंतरवलीत उद्या निर्णयक बैठक होणार असून, या बैठकीत उमेदवार पाडायचा की लढवायचा याचा अंतिम निर्णय होणार आहे. आमचे उमेदवार कुठेही जाणार नाही. लढायचं ठरलं तर माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी वेळ कमी नाही. मात्र, समोरच्यांसाठी कमी आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडे टफ उमेदवार आहेत. पण जरी टफ असले तरी उमेदवार द्यायचा एकच आहे. त्यामुळे त्यांची गणितं कशी आहे हे बघण्यासाठी आम्हालाही त्यांची यादी बघायची असल्याचे सांगत आमचे कितीही उमेदवार असले तरी ते तिकडे जात नाहीत असा विश्वासही जरांगेंनी बोलून दाखवला.