म्हणून मोदींना वारंवार यावे लागते – शरद पवार यांची टीका
पुणे, १ मे २०२४: ‘ कर्नाटकात एकाच टप्प्यात, तर उत्तर प्रदेशात दोन टप्प्यात निवडणूका होत आहे. मात्र महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूका कशासाठी,’’ असा सवाल करून ‘‘ याचे कारण म्हणजे त्यांच्या यंत्रणांचा अहवाल त्यांना चांगला दिसत नाही, यश मिळण्याची शक्यता दिसत नाही, म्हणून देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा यावे लागते,’ अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्ह्यातील चार उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते.पवार म्हणाले, ‘‘२०१४ च्या निवडणुकीत पेट्रोलचा दर ७१ रुपये लिटर होता. तेव्हा सत्तेत आल्यावर तो आपण पन्नास दिवसात कमी करू असे मोदींनी सांगितले होते. आज ३ हजार ६५० दिवस झाले. आता पेट्रोलचा दर १०६ रुपये लिटर झाला आहे. घरगुती गॅस ४१० रुपयांवरून खाली आणू. आज तो १ हजार १६० रुपये झाला आहे. मतदानाला जातांना सिलेंडरला नमस्कार करून जा आणि मते द्या, असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले होते.त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही.’’
आज तरुणांच्या मध्ये अस्वस्थता असून, दोन कोटी लोकांना नोकरी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. ‘आयएलओ’ संस्थेच्या अहवालानुसार आज शंभर पैकी ८७ तरुणांना नोकरी मिळू शकत नाही, असे सांगून पवार म्हणाले,‘‘ त्यांच्या हाती सत्ता देणे हे देशाच्या हिताचे नाही असा निष्कर्ष यावरून निघतो. सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी वापरायची असते. मोदी या सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे देशात बदल करण्याची गरज असून, निवडणुकीने ती संधी दिली आहे.’’
नाना पटोले म्हणाले,‘‘ मोदी-शहा यांच्या तानाशाह सरकारने संविधानिक लोकशाही सरकार संपविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महाराष्ट्राने एल्गार पुकारला आहे. जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी केवळ गुजरातचे आहेत. खोके सरकार येथील उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले. महाराष्ट्रात ड्रॅग हे गुजरातच्या मार्गाने आणून शिवाजी महाराजांचे मावळे बरबाद केले जात आहेत, हे पाप केल्यावर महाराष्ट्र कधीही शांत राहणार नाही.’’
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘ महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करायचा आहे. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, महाराष्ट्राच्या विरोधात असलेल्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवायची आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक घालविण्याचे पाप या सरकारने केले. भ्रष्टाचाराचा हिशोब राहिला नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत करताना एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवायची, आणि दुसरीकडे त्यांनाच बरोबर घ्यावयाचे. आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा, अशोक चव्हाण यांच्या बाजूने मी लढले. आता तेच सहा वर्षे खासदार झाले. प्रामाणिक काम करणाऱ्यांना मात्र निवडणुक लढून पाच वर्ष खासदार व्हावे लागत आहे. मी काहीच विकास केला नाही, असे म्हणणाऱ्या लोकांना माझे पुस्तक मी पाठवले आहे. ते वाचल्यावर कदाचित ते सुद्धा तुतारीला मत देतील.इतके वाईट गुण होते तर सडे सतरा वर्षे गप्प का बसलात. त्यांना कोण भाषणे लिहून देतात ते माहिती नाही. ’