…तर विधानसभेला इंगा दाखवेल – लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

अंतरवाली सराटी, ५ जून २०२४: लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूक निकालांमध्ये इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. तर ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला एनडीएसह ३०० जागांची संख्याही ओलांडता आलेली नाही. पंकजा मुंडे यांचाही पराभव मतमोजणी दरम्यान ज्या घडामोडी झाल्या त्यानंतर जाहीर झाला. रावसाहेब दानवेंनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला होता मात्र त्यांचाही पराभव झाला. महाराष्ट्रात भाजपाच्या २०१९ मध्ये २३ जागा होत्या, त्यावरुन ही संख्या २०२४ मध्ये ९ वर आली आहे. या सगळ्यात मराठा आंदोलनाचा फॅक्टर होता अशा चर्चा होत आहेत. या चर्चा होत असतानाच मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना आता इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात भाजपाचा ४५ + चा नारा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील असं सुरुवातीला जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपाला २०१९ मध्ये २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र याच भाजपाला २०२४ च्या निवडणुकीत अवघ्या ९ जागा मिळाल्या आहेत. फोडाफोडी, मराठा आंदोलन, इतर पक्षातल्या नेत्यांचे पक्षप्रवेश या सगळ्याचा फटका भाजपाला बसल्याची चर्चा होते आहे. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे या मराठवाड्यातल्या उमेदवारांना मराठा आंदोलनाचा थेट फटका बसल्याचं निवडणूक निकालाने दाखवून दिलं आहे. निकालानंतर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यावेळी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सूचक इशारा दिला आहे. तसंच मी कुठेही कुणालाही पाडा हे सांगितलं नाही. पण मराठ्यांची मतं महत्त्वाची असतात, लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. असं मनोज जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना काय इशारा?

“देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही अंगावर घालू नये, लोकसभेला जसा इंगा दाखवला तसा विधानसभेलाही दाखवेन” हा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे. “आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला राज्यातील २८८ जागांवर आम्ही निवडणूक लढवू, प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, ते पडायला नको होते.” असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच पंकजा मुंडेंनी पराभवाची कारणं शोधली पाहिजेत असंही वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणं शोधली पाहिजेत असंही वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे.