काँग्रेसला धक्का! खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन
नांदेड, २६ आॅगस्ट २०२५ : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत भाजपाला धक्का देणारे खासदार वसंतराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने आज हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाने वसंतराव चव्हाण यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस सावरण्याची जबाबदारी दिली होती.
लोकसभेच्या नांदेड मतदार संघात वसंत चव्हाण यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवले. तसं पाहिलं तर वसंत चव्हाण यांची प्रकृती त्या आधीपासूनच बरी नव्हती, त्यांना नियमितपणे डायलिसिस करावी लागायचे. परंतु पक्ष अडचणीत सापडल्यामुळे वसंत चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ज्या अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात २०१४ पासून वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये काम केले त्याच अशोक चव्हाण चव्हाण यांना आव्हान देण्याचे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचे शिवधनुष्य वसंत चव्हाण यांनी पेलले.
आक्रमकपणे प्रचार करत त्यांनी नांदेडमध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा दमच अशोक चव्हाण आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना भरला होता. जून २०२४ चा निकाल लागला तेव्हा नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. अशोक चव्हाण व तत्कालीन भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशा चार पक्षांची ताकद असूनही केवळ निष्ठेच्या जोरावर वसंतराव चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना धूळ चारली होती.
१९७८ मध्ये ते नायगावचे सरपंच होते. १९९० ते २००२ या काळात त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून भूमिका बजावली. .
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काही काळ त्यांनी काम पाहिले. त्यानंतर २००२ मध्ये वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची थेट विधान परिषदेवर वर्णी लागली. विधान परिषदेचा कालावधी संपल्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली.
मतदारसंघात चांगला जनसंपर्क आणि काम असल्यामुळे ते निवडून आले. आमदारकीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुसऱ्यांदा त्यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. याच दरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी जिल्ह्यात अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की राजकारणातून प्रकृतीमुळे निवृत्त होऊ पाहत असलेल्या वसंतराव चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला सावरण्याची मोठी जबाबदारी स्वीकारावी लागली.
अशोक चव्हाण यांच्या ऐन लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकनिष्ठ काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल रोष होता. अशावेळी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध लोकसभा निवडणुकीत निष्ठावान उमेदवाराला मैदानात उतरवल्यास नांदेडची जागा महाविकास आघाडी जिंकू शकते, असे मत राज्यातील नेत्यांचे झाले होते. पक्ष अडचणीत असल्यामुळे वसंतराव चव्हाण यांनीही आपल्या प्रकृतीचे कारण पुढे न करता पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते हिरारीने सहभागी झाले होते.