शिवसेना कुणाच्या बापाची नाही: उदय सामंत
पुणे, ३० सप्टेंबर २०२३: शिवसेना ही जशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बापाची नाही, तशीच ती इतरही कुणाच्या बापाची नाही. ती केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, आणि त्यांच्या विचाराचे खरे वारस आम्ही आहोत, असे मत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत, त्यामुळे खरी राष्ट्रवादी अजित पवार यांची आहे, असेही ते म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघात शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी युवा सेनेचे किरण साळी, राहुल कलाटे उपस्थित होते. सामंत म्हणाले, अजित पवार व इतर नेत्याचे जसे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, तसाच एक व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे यांचाही व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते काँग्रेससोबत कधीही जाणार नाही म्हणतात. मात्र, काही जण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याने आम्ही वेगळा निर्णय घेतला. शिवसेना आमच्या बापाची आहे, असे आम्ही कधीही म्हंटलेले नाही. ती जशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बापाची नाही, तशीच ती इतरही कुणाच्या बापाची नाही. ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याने खरी राष्ट्रवादी अजितदादांचीच आहे, असेही सामंत म्हणाले. भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाईल आणि लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही जागावाटपासंदर्भात योग्य निर्णय घेतील. तिनही नेत्यांना राज्याची भौगोलिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती माहिती आहे. विद्यमान खासदारांना संधी देण्याचा प्रयत्न असेल. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला कुठे उमेदवारी द्यायची, हा अधिकार सर्वस्वी एकनाथ शिंदे यांनाच असेल असेही सामंत म्हणाले.
डाओसमधील ७७ टक्के करार यशस्वी
डाओस मध्ये किती करार झाले, किती उद्योग सुरू झाले, याची माहिती देताना सामंत म्हणाले, डाओससाठी ४० कोटी खर्च झाला, असा आरोप खोटा आहे. यासाठी ३२ कोटी खर्च आला आहे. ही परिषद ४ दिवसांची होती. येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला १६ कोटी खर्च आला. प्रसिद्धी २ कोटी रुपये खर्च झाला. तर २०२२ ला प्रसिद्धीसाठी ३. ४४ कोटी खर्च करण्यात आला. त्यावेळी शिष्टमंडळाने छोटे होते, यावेळी शिष्टमंडळ अधिक होते. डाओसमध्ये १ कोटी ३७ लाखाचे करार (एमओयू) झाले. २०२२ ला ८७ हजार कोटीचे करार झाले होते. २०२३ ला १९ करार झाले त्याची रक्कम १ लाख ३७ कोटी, १ लाख रोजगार मिळणार आहे. ७७ टक्के उद्योजकांना देकार पत्र देण्यात आली.