शिंदेंचे एकाच दगडात ‘दोन’ पक्षी; संपर्क अभियानातून पक्षाला ‘बूस्टर’ अन् ठाकरेंना देणार धक्का!
मुंबई, ६ जून २०२३ : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाही तरी देखील नेते मंडळींनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) मुंबईत शाखा संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाची माहिती देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच या संपर्क अभियानाच्या माध्यमातून मुंबईत काय कामे करणार याचीही माहिती त्यांनी दिली.
शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांबरोबर बैठक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शाखा संपर्क अभियान आम्ही सुरू केले आहे. प्रतिसाद चांगला मिळत आहे. या अभियानात लोकांशी संवाद साधला. ज्या समस्या दिसल्या त्या सोडविण्यासाठी आयुक्तांबरोबर बैठक घेतली. या शाखा संपर्क अभियानाचा काय परिणाम होईल तो निवडणुकीत नक्कीच आपल्याला दिसेल.
आता लोक सूज्ञ झाले आहेत. ज्यांनी आतापर्यंत फक्त भावनिक राजकारण करून मतं मिळवली आणि एसी केबिनमध्ये बसून आदेश देण्याचे काम केले. असे काम आम्ही कधी करत नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जायला सांगितले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. लोकं आम्हाला समस्या सांगत आहेत. गेली अनेक वर्षे तुम्ही ज्या समस्या सोडवू शकले नाहीत त्या सोडविण्याचे काम आता आम्ही करत आहोत, असा टोला शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.
ते पुढे म्हणाले, निवडणुका आल्या की भावनिक राजकारण करण्याची आमची सवय नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो. म्हणून ठाण्यात आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले. पण, मुंबईकर आज अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. त्यांच्या या समस्या सुटल्या पाहिजेत, यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत.
आमदार खासदारांनाही भेट नाही
सगळ्या ठिकाणी शिवसेना शाखा संपर्क अभियान आम्ही सुरू केले आहे. पक्षाला मजबूत करण्याचे कामही या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आधी तर कार्यकर्त्यांना सोडाच आमदार खासदारांना सुद्धा भेटत नव्हते. परत अशी वेळ आली नाही पाहिजे. म्हणून आमचे सगळे नेते मैदानात येऊन आता काम करत आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप