राष्ट्रवादी जातीयवाद”च्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर

कोल्हापुर, ८ जानेवारी २०२३ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या पक्षाचं नेतृत्व पहिल्यांदा छगन भुजबळ यांनी केलं, नंतर मधुकर पिचड यांनी केलं. ते कोणत्या समाजाचे होते हे सांगण्याची गरज नाही,” असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. ते रविवारी (८ जानेवारी) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

शरद पवार म्हणाले, “राज ठाकरे आरोप काहीही करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या पक्षाचे नेते कोण होते याची नोंद पाहिली तर पहिलं नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे होतं. ते कुठल्या समाजाचे आहेत मी सांगण्याची गरज नाही. नंतरच्या काळात मधुकर पिचड होते. ते आदिवासी समाजाचे होते. अशा अनेक लोकांची नावं सांगता येतील.”

 

“खरंतर ही नावं सांगण्याचीही गरज नाही, कारण हा विषय कधी आमच्या मनातही येत नाही. आम्ही सर्व शाहू-फुले-आंबेडकर विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी अशी टीका केली तर त्याची आम्ही दखल घेत नाही,” असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावर एका वाक्यात मिश्किल टिपण्णी केली. शरद पवार म्हणाले, “ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत.” राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले.”

“महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते,” अशी टीका शरद पवार यांनी केली.

“ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही,” असा आरोप शरद पवार यांनी केला.