प्रकाश आंबेडकरांना ‘मविआ’त घेणार – शरद पवार
शिर्डी, ५ जानेवारी २०२४: महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसह सर्वांना सोबत घेणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत भाजपला हरवावे, यासाठी त्यांची सहकार्य करण्याची तयारी आहे. त्यांच्या सोबतची बोलणी योग्य मार्गावर आहेत. तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही, हा प्रचार खोटा आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना पर्याय देत आहोत. भाजप हिंदुत्व आणि उम्र राष्ट्रवादाच्या माध्यमातून फॅसिस्ट राज वट आणू पाहात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
शिर्डी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराचा समारोप करताना ते
बोलत होते. पवार म्हणाले, की इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न विचारला जातो. मात्र जनता पक्ष सत्तेत आला त्या वेळी पंतप्रधानाचा उमेदवार कुठे जाहीर झाला होता? खासगीकरण, खोटा प्रचार, धार्मिक तेढ, स्वायत्त संस्थांवर ताबा आणि धार्मिक राजकारण या पंचसूत्रीच्या आधारे भाजप देशात फॅसिस्ट राजवट आणू पहात आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनास महिला राष्ट्रपतींना बोलविण्यात आले नाही. महिलांच्या नव्या कायद्याची अंमलबजावणी २०२९-३० साली केली जाणार आहे, त्याची काय गॅरंटी आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. ईडीचा गैरवापर सुरू आहे. विरोधकांना नाउमेद केले जात आहे. भाजपने देशात वेगळे वातावरण तयार केले आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
आरक्षण मुद्द्यावर तरुणांत अस्वस्थता
“आम्ही मुस्लिमांसाठी पाच टक्के शैक्षणिक आरक्षण ठेवले, ते त्यांनी सत्तेवर येताच रद्द केले. धनगर, लिंगायत, मुस्लिम या सर्वांना आरक्षण मिळावे, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी सगेसोयऱ्यांसह आरक्षण देऊ, असे लिहून दिले. आता मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, पुढील वर्षभर आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे तरुणांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे”, असे ही पवार म्हणाले.