शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार नाहीत ः बावनकुळे
पुणे, १८ आॅक्टोबर २०२४ ः शरद पवार यांना शिवसेना-भाजप युती तोडायची होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना जे जमले नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केले. त्यांना युती तोडण्यात यश मिळाले आहे. आता शरद पवार व काँग्रेसच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता संपली आहे. विधानसभा निवडणुकीत ते उद्धव ठाकरे यांना फिरवती, त्यांची भाषणे घेतील. मात्र, पुन्हा मुख्यमंत्री करणार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बानवकुळे यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पुण्यातील एका हॉटेलमध्ये शहरातील इच्छुकांची बैठक घेतली, त्यांची समजूत काढण्यासोबतच काहींना सज्जड दम ही दिला. बैठक उरकून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असताना शरद पवार जे करू शकले नाहीत ते त्यांनी उद्धव ठाकरेच्या माध्यमातून केले. आता उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता संपली आहे. पवारांना त्यांच्या मुलीला सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे विधानसभेला उद्धव ठाकरेंना फिरवतील, त्यांची भाषणे होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट आहे. त्यांचा दसरा मेळावा हास्ययात्रा होती. त्यांची परिस्थिती शरद पवारांनी शोले मधील जेलरसारखी केली आहे. कोई लौटादे मुझे बिते हुए दिन, असे म्हणण्याची वेळ ठाकरेंवर आली आहे. याला जबाबदार स्वतः उद्धव ठाकरेच आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत दिल्लीला गेले होते, त्यांना कोणी दाद दिली नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
महायुतीचे ९० टक्के जागांवर एकमत झाले आहे. दहा टक्के जागा बाकी आहेत. मी जागावाटपासाठी नव्हे तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी दिल्लीला जात आहे. कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणे, यात काहीही गैर नाही. कोणी पक्षातील इच्छुक असेल तर प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांची भेट घेणे, त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे चुकीचे नाही. इच्छुकाला बंडखोर म्हणता येणार नाही. मात्र, एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संबंधीताने उमेदवारी अर्ज भरला तर त्याला बंडखोर म्हणावे लागेल. आम्ही समाज म्हणून नाही तर कतृत्व पाहून उमेदवारी देणार आहोत.
वडगावशेरी मतदारसंघ भाजपकडे राहणार, अशी काय चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही, ही चर्चा माध्यमांमधूनच ऐकण्यात आली आहे. अजित पवार महायुतीचे नेते आहेत, त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी त्यांची भेट घेणे, यात गैर काहीच नाही, असेही बावनकुळे म्हणाले,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला न्याय देण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जनता विकासाला मत देणार आहे, टोमणेबाजीला नाही. महाराष्ट्राला मोदी सरकारच्या मदतीने दैवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एक नंबरला नेणार आहेत. महायुती सत्तेत आली तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार का. या प्रश्नाचे उत्तर मात्र बावनकुळे यांनी दिले नाही. संजय काकडे यांच्या पक्षांतराबद्दल काही माहिती नाही.
महादेव जानकर यांच्या शी बोलू, ते महायुतीतील महत्वाचे नेते आहेत, ते मनाने चांगले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत आमचे नेते बोलतील, असेही बावनकुळे म्हणाले.
नांदेडची पोटनिवडणुक भाजप लढणार ः
नांदेड लोकसभा पोटनिवडणुक आम्हीच भाजप म्हणून लढणार आहोत. याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पाठींबा दिला आहे, अशीही माहिती बावनकुळे यांनी दिली.
मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरे ः
भाजप नेते मनोज जरांगे यांना भेटल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, सामाजिक आंदोलकांना जावून भेटणे, त्यांची समजुत काढणे, त्यात वाईट काय आहे. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी ठाकरेंवर बोलणे गरजेचे आहे, असेही बावनकुळे म्हणाले.