शरद पवार यांनी केली भाजप नेत्याची आपुलकीने चौकशी

पुणे, १८ सप्टेंबर २०२२: पुण्यात शरद पवार, सुरेश कलमाडी यांचे वर्चस्व असताना टभाजपचा एक आमदार वर्षानुवर्ष कसबा मतदारसंघातून निवडून येत होता. त्यामुळे या आमदारांचे सर्वांचे चांगले संबंध आहेत. अनेक वर्षानंतर शरद पवार आणि ते आमदार एकाच वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यावेळी मात्र, पवारांनी न विसरता तुमची तब्येत कशी आहे अशी अस्थेने चौकशी करत पक्षीय राजकारणाचा संबंध बाजूला ठेवला. याची चांगलीट चर्चा रंगली. हा प्रसंग घडला माजी आमदार आणि विद्यमान लोकसभा खासदार गिरीश बापट.

पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आयोजित विश्वस्त परिषदेला शनिवारी पुण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार गिरीश बापट, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. गिरीश बापट खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली होती. पुणे जिल्ह्यात पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले कार्यरत राहून वेगळे स्थान निर्माण केले आहे. पवार आणि बापट यांच्यात पूर्वीपासून चांगले संबंध असल्याने त्यांच्यातील हा आपुलकीचा संवाद उपस्थितानाही भावला.
पवार यांनी बापट यांना पाहताच कशीय आता तब्येत? अशी चौकशी करत हस्तांदोलन केले. त्यावर बापट यांनी “बरीय साहेब आता!” असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांच्यात इतर चर्चा रंगली.