शरद पवार आणि मी रोज भेटतो, भविष्यात आणखी जवळ जाईन – रामदास आठवलेंच्या वक्तव्याने भाजपचे टेंशन वाढले
मुंबई, १ मे २०२४: शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मैत्री असल्याचे वक्तव्य आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती तशीच आमची देखील असल्याचे ते म्हणाले. भविष्यात अजून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मी करेन. आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत शरद पवार राहिले, याबाबत भविष्यात विचार करु असे आठवले म्हणाले.
मला तिकीट दिलं नाही तरीदेखील मी भाजपसोबतच आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते तर नक्की मिळाली असती असंही आठवले म्हणाले. आपली राज्यसभा २०२६ पर्यंत आहे. त्यांनंतर देखील मिळेल असे आठवले म्हणाले. जागा मिळाली नसली तरी मी महायुतीसोबत आहे. माझ बिनशर्त पाठिंबा नाही. आमची फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आहे. RPI ला एक मंत्रिपद राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत १० जागा देण्याचं मान्य केलं आहे. केंद्रात एक मंत्रिपद आम्हाला मिळेल असे आठवले म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आमच्या समाजातील ज्येष्ठ आणि अभ्याससू नेते आहेत. कधी काय करायचं त्यांना चांगल माहिती आहे. पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांना यश मिळणार नाही असेही आठवले म्हणाले. जानकर शरद पवार यांना भेटले म्हणून त्यांना जागा मिळाली. मी नाही भेटलो म्हणून जागा मला मिळाली नाही असे रामदास आठवले म्हणाले. शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मैत्री कायम असल्याचे आठवले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. देशात दोन टप्प्यातील निवडणूक पार पडली आहे. महाराष्ट्रातही काही भागात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुढचा टप्पा ७ मे ला होणार आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केलीय.