शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने महायुतीच्या पाच जागा डेंजर झोनमध्ये
नाशिक, ६ मे २०२४ : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज (६मे) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करण्यात आले, पण ते शेवटपर्यंत अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. महाराजांच्या या उमेदवारीचा नाशिकसह दिंडोरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्येही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे.
शांतिगिरी महाराज हे सुरुवातीपासून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मध्यंतरीच्या त्यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. पण शिंदे यांनी उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात टाकली. त्यानंतरही शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. छाननीच्या दिवशी यातील शिवसेनेकडून भरलेला अर्ज बाद झाला, तर अपक्ष अर्ज कायम राहिला.
नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतिगिरी महाराज त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्यांच्या या मतांमुळे महायुतीला फटका बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संकटमोचक म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री दादा भुसे या सर्वांनी महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण या मनधरणीला फारसे यश आले नाही.
शांतीगिरी महाराज यांचा छत्रपती संभाजीनगरसह धुळे, जळगाव, नाशिकमध्येही मोठा भक्तपरिवार आहे. या भक्तांच्या विश्वासावर त्यांनी २००९ मध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती. त्यावेळी त्यांनी दीड लाख मते घेतली होती. त्यांच्या उमेदवारीचा तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठा फटका बसला होता. २००४ मध्ये एक लाख ३२ हजारांचे मताधिक्य घेणाऱ्या खैरेंचे २००९ मध्ये मताधिक्य अवघ्या ३२ हजारांवर आले होते. पण त्यानंतर महाराज काहीसे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले.
२०१९ मध्येही महाराजांनी छत्रपती संभाजीनगरमधूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी केल्याची चर्चा होती. पण युती झाल्यानंतर त्यांनी अपक्ष तयारीला सुरुवात केली. जिल्हाभरातील भक्तांशी चर्चाही केली. इतकंच नाही तर निवडणूक कार्यालयातून दोन उमेदवारी अर्ज सुद्धा घेतले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यंदा मात्र त्यांनी नाशिकमधून निवडणुकीची तयारी सुरु केली होती. ती आता अर्ज भरुन कायम ठेवण्यापर्यंत आले आहे. महाराजांच्या या उमेदवारीचा नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.