नेरेटिव्ह सेट करून वातावरण तयार होते पण निवडणूक जिंकता येत नाही: देवेंद्र फडणवीस

पुणे, ११ मे २०२४ : “देशातील लोकसभा निवडणुकीत विरोधक ‘नरेटिव्ह सेट’ करत आहेत. पण, ‘नरेटिव्ह सेट’ करून निवडणुकीचे वातावरण तयार करता येते, पण निवडणूक जिंकता येत नाही. मतदारांना विकासाची कामे सांगावी लागतात. विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट करावा लागतो. फक्त गद्दार आणि खुद्दार म्हणत मते मिळत नाहीत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी व्यासपीठावर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “देशातील सुजाण नागरिकांना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामाची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे महायुतीला देशात बहुमत मिळेल, असा विश्वास आहे. पण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत नरेटिव्ह सेट करत आहेत. त्यांच्या भाषणांमधून विकासाचा दृष्टिकोन सांगितला जात नाही. त्यामुळे राज्यात बहुसंख्य जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र, आतापर्यंतची निवडणूक व्यवस्थित झाली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षित जागा निश्चित मिळतील.”
शरद पवार यांनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविली आहे. हे त्यांचे मोठेपण मान्य करावे लागेल. पण, त्यांचा पक्ष जेव्हा-जेव्हा कमकुवत झाला, तेव्हा-तेव्हा पवार यांनी तो काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर काही काळ काँग्रेसमध्ये थांबून पुन्हा बाहेर पडतात, असे आतापर्यंत दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींची ती ‘ऑफर’ नव्हती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना महायुतीमध्ये सहभागी होण्याची ‘ऑफर’ दिली. याबद्दल फडणवीस म्हणाले, “मोदींनी पवारांना ‘ऑफर’ नाही तर सल्ला दिला आहे. बारामती लोकसभेच्या जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून येत असल्याचे दिसल्यानंतर पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याचे विधान केले. त्यामुळे मोदी यांनी सल्ला दिला की, पवारांनी अजित पवारांकडे यावे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जावे. कारण, काँग्रेस ही बुडणारी नौका आहे. ते तुम्हाला वाचवू शकत नाहीत. महायुतीमध्ये आल्यानंतरच तुमची राजकीय स्वप्न पूर्ण होतील, असा सल्ला मोदींनी पवारांना दिला होता. ती ‘ऑफर’ नव्हती.