संजय शिरसाट यांच्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरून गौप्यस्फोट
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२४ : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या एका नेत्याने २०१९ च्या सत्तास्थापनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती. यासाठी एका व्यक्तीने मध्यस्थीही केली होती. पण तसं झालं नाही”, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बड्या नेत्याने केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नुकतंच एबीपी माझाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी २०१९च्या सत्तास्थापनेवेळी काय घडलं? याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम सांगितला. “२०१९ च्या निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेनेला बहुमत दिलं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावं अशी मागणी शिवसेनेची होती. संजय राऊत उद्धव ठाकरेंचं कान भरायचे. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. भाजपने पहिले अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी शिवसेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावं”, अशी मागणी होत होती.
“उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाहीत”
“भाजपने उद्धव ठाकरेंना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास संमती दर्शवल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाहीत. गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना सांगितलं की बोलणं करून द्या, पण त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही. शिवसेना-भाजपची ही युती तुटू नये यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंनीही त्यांना सांगितलं की भाजप मुख्यमंत्री पद देतंय, तुम्ही याबाबत विचार करा. पण उद्धव ठाकरे म्हणाले की मी त्यांच्यासोबत जाणार नाही, तू जा. त्यांना पाच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं होतं, पण तसं झालं नाही आणि आमचा नाईलाज झाला. आम्ही जो उठाव केला त्याला या बाबीही जबाबदार आहे. ठाकरेंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आम्ही उठाव केला”, असे संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्रात २०१९ ला झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदाचा मोठा वाद निर्माण झाला होता. अमित शाहांनी आपल्याला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देतो असा शब्द दिला होता असा दावा उद्धव ठाकरेंकडून सतत होत होता. तर भाजपकडून असा कोणताही शब्द दिला नव्हता असा दावा करण्यात आला होता. यामुळे शेवटी मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये फूट पडली आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं.