बीडचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको संजय राऊत यांची मोठी मागणी

मुंबई, २७ डिसेंबर २०२४ : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली. त्यानंतर नवनीत कॉवत यांची बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत यांनी एक मोठी मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत थेट टीका केली.

“त्यांचा आका धनंजय मुंडे”

“बीडमध्ये गेल्या वर्षभरात 38 खून झाले. बीडमधील गावात लहान पोरं हातात बंदूक घेऊन असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. हे सगळे लोक एकाच गँगचे नाव घेत आहेत. त्यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगाराचा सरदार आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

“आम्ही अमुक अमुक माणसाचे शुटर आहोत.  तुम्ही काय पेरत आहात जे पेरलं ते उगवला आहे. मी खात्री ने सांगतो एकही मुंडे तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये. वारंवार माहिती पुढे आले आहे. बीडमध्ये काय चाललं आहे हे नवीन नाही. संतोष देशमुख यांचा खून त्यांना पचवता आला नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

“पोलिसांना सहकार्य करा”

“ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री दुबळे आहेत. कमजोर आहेत. गृहमंत्री नाकाने कांदा सोलत आहेत. कोणाला सोडणार नाही की तेही मोठा असू द्या, तरी तो तुमच्या पदराखाली आणि तुमच्या खिशात आहे.  मग तो जवळचा तुमच्या कोणी असेल, त्याला फाशीच्या तक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा”, असेही चॅलेज संजय राऊतांनी केले.