थोड्याच दिवसात आदित्य ठाकरेंसह संजय राऊत तुरुंगात असतील – नारायण राणे यांचे भाकित
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३: राज्यातील शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार ३१ डिसेंबरपर्यंत पडणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्र सोडलं. थोड्याच दिवसात आदित्य ठाकरेंसह संजय राऊत तुरुंगात असतील, असा वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. राणे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील सरकार पडेल, या आदित्य ठाकरेंच्या दाव्याबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “आदित्य ठाकरे कोण आहे? त्यांना मी गांभीर्याने घेत नाही. आता ते सभा घेत नाहीयेत, ते खळा बैठक घेत आहेत. ही अधोगती नाही का? जाहीरसभेला मोठं मैदान लागतं, पण आता ते खळा बैठका घेत आहेत. याचाच अर्थ शिवसेना अधोगतीकडे पोहोचली आहे.”
“आदित्य ठाकरे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अनेकदा सरकार पडणार असल्याचं बोलत आहेत. पण तो बोलून सरकार पडणार आहे का? त्यांचे १६ आमदार आहेत. निवडणुकीत पाचही निवडून येणार नाहीत. ही त्यांच्या पक्ष्याची स्थिती आहे. असं असताना आमचं सरकार कसं काय पडणार? अपात्रतेचा निर्णय दोन्ही बाजुंचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही बाजूंचे लोक त्यात आहेत. त्यामुळे सरकार पडेल असं वाटत नाही. शिवाय राखीव म्हणून आमच्याकडे अजित पवारही आहेत,” असंही नारायण राणे म्हणाले. ते सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आगामी निवडणुकीत १६ चे १६० आमदार करण्याबाबत आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर नारायण राणे पुढे म्हणाले, “ही काय जादूची कांडी आहे का? स्वत:चे जे होते ते सांभाळता आले नाहीत. एकनाथ शिंदे दिवसाढवळ्या त्यांना घेऊन गेले. जे जाहीरसभा घेऊ शकत नाहीत, ते आता खळा बैठका घेत आहेत. अशी शिवसेनेची स्थिती आहे. थोड्या दिवसांनी आदित्य ठाकरे या बैठकांनाही नसेल, तो सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात तुरुंगात असेल. संजय राऊतही तुरुंगात जातील. मी त्यांच्यावर बोलायचं टाळतो. कारण बावळट माणसांवर बोलायला मला आवडत नाही.”