संजय राऊत यांची भाषा बदलली म्हणाले “अजित पवारांबद्दल मी काय बोलणार”

मुंबई, २२ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत निर्णयांबद्दल वारंवार स्वतःचे मत व्यक्त करणारे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची वक्तव्य महाविकास आघाडीसाठी अडचणीची ठरत होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना ते काय आमच्या प्रवक्ते आहेत का असा प्रश्न करत त्यांच्या या बोलण्यावर वारंवार आक्षेप घेतला होता. आता अखेर संजय राऊत यांनी त्यांची नांगी टाकली असून राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर मी काय बोलणार अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर आता अजित पवार यांनीही विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या, अशी विनंती बुधवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर भाष्य केलं आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या मुद्द्यावर त्यांनी सुरुवातीला बोलणे टाळले. पण, पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणाले, यावर मी काय बोलू? ही त्यांची अंतर्गत बाब आहे. विरोधी पक्षनेतेदी कोणाला नेमायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. यावर काँग्रेस काय बोलणार, शिवसेना काय बोलणार असे प्रश्न विचारून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका.

ते पुढे म्हणाले, अजित पवार विरोधी पक्षनेते पदावर चांगले काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात जे काही वक्तव्य केले त्यावर इतरांनी बोलू नये असे वाटते. शरद पवार साहेब आणि त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी काय ते ठरवेल. पवार साहेब जर यावर काही बोलले नसतील तर आम्ही काय बोलणार ?

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्याची स्वत:हून तयारी दर्शवली. त्यासाठी मला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा, अशी थेट मागणी व्यासपीठावरुन पक्षाकडे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात केली होती.