हुतात्मांचे बलीदान वाया जाऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
पुणे, १ मे २०२४ : ‘महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले. ते हुतात्मे महाराष्ट्राची होणारी लूट आणि पायदळी तुडविली जात असलेली अस्मिता पाहत आहेत. कोणासाठी बलिदान दिले असे त्यांना वाटत असले. त्यामुळे प्राण गेला, तरी चालेल हुकूमशाहांच्या ताब्यात महाराष्ट्र जाऊ देणार नाही,’’ अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी-शहांवर मंगळवारी तोफ डागली. ‘ एक अकेला भारी,सोबत सगळे भ्रष्टाचारी अशी टीका त्यांनी यावेळी मोदी यांच्यावर केली.
महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर लोकसभा उमेदवार डॉ अमोल कोल्हे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख सचिन अहीर, मदन बाफना, जगन्नाथ बापू शेवाळे, कुमार गोसावी, विठ्ठल मणियार, चंद्रकांत मोकाटे, जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. आरक्षण, संविधान, निवडणूक रोखे घोटाळा प्रकरणापासून ते पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाचा कडक भाषेत ठाकरे यांनी समाचार घेतला.
उद्या महाराष्ट्र दिन असून, हुतात्मा स्मारकावर जाऊन ती अभिवादन करणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला ही सभा होत आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तेव्हाच जनसंघ सहभागी झाला नव्हता. माझे आजोबा आणि वडील अग्रभागी होते. संयुक्त जनसंघ समितीत सामील झाला, परंतु जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली, तेव्हा समिती फोडण्याचे पाप या भाजपच्या बापाने म्हणजे जनसंघाने केले होते. भाजपने कायमच महाराष्ट्रावर अन्याय केला. त्यामुळे मी शपथ घेऊ सांगतो, महाराष्ट्रासाठी ज्यांनी मर्दासारखे गोळ्या छातीवर घेतल्या, तो महाराष्ट्र हुकूमशहाच्या कचाट्यात मी जाऊ देणार नाही.’’
सुप्रिया तुमचे मला कौतुक वाटते. पहाडसारखी तू बापासोबत उभी राहिली, असे सांगून ठाकरे म्हणाले,‘‘पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना काय केले असे विचारात, तर त्यांनी देशातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले. महाविकास आघाडीचा मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे पीककर्ज माफ केली. आम्ही कधी खोटे बोललो नाही, जे बोलतो ते करून दाखवतो. राष्ट्रवादीला करप्ट पार्टी म्हणता. परंतु सत्तर हजार कोटींची घोटाळा कोणी केला, बँक घोटाळा कोणी केला. त्यांना आज त्यांना तुम्ही बरोबर घेतले. तेव्हा ही करप्ट पक्ष तुम्हाला कसा चालतो. माझ्या शिवसेनेला नकली म्हणता, त्यांच्या सोबत असलेल्या गाढवांच्या आणि गद्दाराच्या टोळीला असली शिवसेना मानतात.’’
मोदींची मला किव येते, असे सांगून ठाकरे म्हणाले,‘‘२०१४ व २०१९च्या निवडणुकीत ती त्यांच्या सोबत सभा केल्या. तेव्हा त्यांना एवढ्या वेळा महाराष्ट्रात यावे लागले नाही. माझा लहान भाऊ म्हणून ते उल्लेख करीत होते.तर मग आता नाते का तोडले. दहा वर्षे तुम्हाला जनतेने दिली. तुम्ही काय केले, ते सांगा. दहा वर्षानंतरही कॉंग्रेसने काय केले असे विचारता. याचा अर्थ तुमच्या मानगुटीवरून काँग्रेसचे भूत अजून उतरले नाही.’’
जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रेसकोर्स येथे सभा झाली. त्याचा दाखल देत ठाकरे म्हणाले, ‘‘ ठिकाण योग्य होते. रेसकोर्स. त्यांना झोपेतही घोडेबाजार दिसतो. हे घोडे वेगळे असून, तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतले आहे, ते ओझी वाहणारी गाढवे आणि खेचर आहेत. खरे घोडे अश्वमेधाचे असतात. टरबुजला हातगाडी लागते.’’
रेसकोर्सच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांचे नाव न घेता भटकी आत्मा असा त्यांचा उल्लेख केला होता. त्याचा समाचार ठाकरे यांनी आपल्या भाषणातून घेतला. ठाकरे म्हणाले,‘ ‘ भटकती आत्मा आहे, तशी एक वखवखलेली आत्मा देखील आहे. जी महाराष्ट्रात सगळीकडे फिरून सभा घेत आहे. ती आत्मा स्वत:साठी आणि मित्रांसाठी लढत आहे. त्यांनी जरा शेतकऱ्यांकडेही बघावे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घराकडे आणि त्यांच्या पत्नीच्या तुटलेल्या मंगळसूत्रकडे बघावे. साडेतीनशे वर्षांपूर्वी अशीच एक
वखवखलेली आत्मा महाराष्ट्र आणि स्वराज्यावर चालून आली होती. ती परत कधीच गेली नाही. आजही ती आत्मा महाराष्ट्रात भटकते आहे. एवढी वखवख बरी नव्हे.’’
सर्वसामान्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले नाहीत. परंतु निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात कोट्यवधी रुपये आले. हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले,‘‘ कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी दहा हजार कोटी रुपयांचे रोखे भाजपने छापून ठेवले होते. जे सत्तर वर्षांत काँग्रेसला जमले नाही, ते भाजपने अडीच वर्षांत देशाला लुटले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे चारशे पार नाही, तर तडीपार होणार आहे.’’