रोहित पवार यांचे भर पावसात उपोषण, अजित पवारांनी सभागृहात पुतण्याला झापले
मुंबई, २४ जुलै २०२३ : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी मंजूर झालेली असली तरी शिंदे फडणवीस सरकारने गेल्या वर्षभरापासून या एमआयडीसी संदर्भात आदेश काढलेला नाही. मुद्दामहून हा निर्णय अडवून ठेवण्याचा आरोप करत आज विधिमंडळाच्या अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रोहित पवार यांनी भर पावसात उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
“कर्जत-जामखेडकरांचं एकच मिशन
मंजूर एमआयडीसी चं हवं नोटिफिकेशन!” अशी घोषणाही दिली आहे. त्यासंदर्भात विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर अजित पवार यांनी रोहित पवार यांना झापत उद्योग मंत्र्यांनी, एमआयडीसीचे अध्यक्षांनी निवेदन दिल्यानंतर देखील लोकप्रतिनिधी अशा प्रकारे पावसात आंदोलनाला बसत असेल तर हे योग्य नाही अशा शब्दात कान टोचले.
रोहित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते राम शिंदे यांचा पराभव करून हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतलेला आहे. भाजपने राम शिंदे यांना विधान परिषदेच्या आमदारकी देऊन पुनर्वसन केले आहे. पण कर्जत जामखेड मधील संघर्ष थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंद झाल्यानंतर रोहित पवार हे अजित पवार यांच्यासोबत न जाता आजोबा शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या महिनाभरापासून ते भाजप सह राष्ट्रवादीच्या बंडखोरांवर तुटून पडत आहेत. या सत्ता संघर्षामध्ये रोहित पवार हे त्यांचे स्थान मजबूत करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर आज विधिमंडळ अधिवेशनात दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पावसात रोहित पवार हे “एमआयडीसी संदर्भात झालाच पाहिजे” अशी मागणी करणारा फलक हातामध्ये घेऊन पावसात उपोषणाला बसले आहेत. त्या संदर्भात त्याने ट्विट करून त्यांची भूमिका देखील मांडली आहे.
अजित दादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. एमआयडीसीचा विषय हा आजचा नाही तर केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली, निवेदनं दिली, विधानसभेतही आवाज उठवला. परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनावर बोळवण केली. त्यामुळं नाईलाजाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझी आपणास विनंती आहे की, उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील.
विधानसभेत आमदार अनिल देशमुख यांनी रोहित पवार हे उपोषणाला बसल्याचे संगत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले,” या एमआयडीसीच्या संदर्भात वेगात कार्यवाही करण्यासाठी उद्योग मंत्री विजय सावंत यांच्यासह एमआयडीसीच्या अध्यक्षांनी पत्र दिली आहे. तरीदेखील लोकप्रतिनिधी अधिवेशन संपण्याच्या आधीच आंदोलन करत असतील तर हे योग्य नाही. त्यांनी योग्य पद्धतीने वागले पाहिजे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप