रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले अन सुरु झाला नवा वाद

कराड, २५ नोव्हेंबर २०२४ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आज कराड येथे जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी अजित पवार यांची प्रीतीसंगमावर असताना आमदार रोहित पवारांशी भेट झाली. यावेळी रोहित पवार त्यांच्या पाया पडले. त्यानंतर अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं म्हणाले. यावरून भाजपने पराभूत उमेदवार यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत पवार कुटुंबात सेटींग होती म्हणूनच सभा घेतली नाही असे वक्तव्य केले आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपा उमेदवार राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला आहे. रोहित पवारांना १,२७,६७६ मतं मिळाली आहेत. तर, राम शिंदे यांना १,२६,४४३ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान, अजित पवारांना भेटल्यानंतर व त्यांनी केलेल्या टिप्पणीवर रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “ते माझे काका आहेत. म्हणून मी त्यांच्या पाया पडलो. आता जरी आमच्या विचारांमध्ये भिन्नता असली तरी घरातील ज्येष्ठांच्या पाया पडणं ही आपली संस्कृती आहे. अजित पवार हे आमच्या घरातील वडीलधारे आहेत. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी मला खूप मदत केली होती. तसेच ते माझे काका देखील आहेत. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडणं ही माझी जबाबदारी आहे. तसेच ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे. हे त्यांचं स्मृतीस्थळ आहे. इथे भेदभाव करून चालणार नाही. आपण आपली संस्कृती जोपासलीच पाहिजे आणि आम्ही तरी ती जोपासतो. मी त्यानुसार अजित पवार यांना भेटल्यानंतर त्यांच्या पाया पडलो”.

अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार काय म्हणाले?
दरम्यान या भेटीवेळी अजित पवार रोहित पवारांना म्हणाले की “तुझ्या मतदारसंघात माझी एखादी सभा झाली असती तर तुझी अडचण झाली असती”. यावर रोहित पवार म्हणाले, “नक्कीच, अजित पवारांची सभा झाली असती तर काही प्रमाणात मतं वर खाली झाली असती. कदाचित उलटा निकाल देखील लागू शकला असता. परंतु, अजित पवार हे बारामतीत अडकून पडले होते. त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी ते खूप मोठे नेते आहेत. मतदारसंघात येणं अथवा न येणं हा त्यांचा निर्णय आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मोठं यश मिळवलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं”.