पोस्टाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील फरक मिळाला, आमदार शिरोळे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे, ०१/११/२०२२ – पोस्टातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील फरक मिळावा, यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, दोन दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील फरक मिळाला आहे.

रेल्वे मेल सर्व्हिस आणि पोस्टल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने महागाई भत्त्यातील फरक मिळावा या मागणीसाठी दिनांक २५ ऑक्टोबर रोजी उपोषण केले होते. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी, उपोषण स्थळाला भेट देऊन माहिती घेतली. केंद्र सरकारने महागाई भत्त्यातील फरक जाहीर केला असून, तो निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही ही बाब पोस्टल सर्व्हीस संचालक श्रीमती समिरन कौर यांच्या निदर्शनास आणून दिली. काही तांत्रिक कारणास्तव पोस्टल कर्मचाऱ्यांचा फरक जमा होण्यास विलंब होत आहे, असे कौर यांनी सांगितले आणि यात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आणि दोन दिवसांपूर्वी महागाई भत्त्यातील फरक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

रेल्वे मेल सर्व्हिस आणि पोस्टल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार शिरोळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आभार मानले आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.