भाजपने लोकसभा लढवल्यास पुन्हा राणापाटील-ओमराजे टक्कर ?

उस्मानाबाद, ९ जानेवारी २०२३ : भाजपने मिशन लोकसभा सुरू केल्यापासून आणि मराठवाड्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघावर दावा केल्यापासून खळबळ उडाली आहे. शिंदे गटात नाराजी तर शिवसेनेत चिंतेचे वाततावरण पहायला मिळत आहे. आतापर्यंत मराठवाड्यात शिवसेना-भाजप युतीमुळे ठाकरेंचे खासदार निवडून येत होते असा दावा भाजपकडून केला जातोय.

तर दुसरीकडे शिवसेना मात्र आमची ताकद, कार्यकर्त्यांची तळागाळापर्यंत पोहचलेली फळी, लोकांची केलेली कामे यामुळे समोर कुणीही आले तरी विजय आमचाच होणार असा दावा करत आहेत.  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या निवडणुकीत इथे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि तेव्हा राष्ट्रवादीकडून लढलेल्या राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात लढत झाली होती. शिवसेना-भाजप युती असल्यामुळे ओमराजे हे १ लाख २७ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते.

आता २०२४ ची तयारी भाजपने सुरू केली आहे. उस्मानाबादमध्ये भाजप पहिल्यांदाच लढण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे २०१९ मध्ये एकमेकांविरुद्ध लढलेले राणापाटील आणि ओमराजे निंबाळकर हे पुन्हा मैदानात दिसू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राणा पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रेवश केला होता. यामागे आमदारकी आणि मंत्रीपद मिळवणे हा त्यांचा उद्देश होता.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा पाटलांनी विजय मिळवला पण शिवसेनेने राष्ट्रवादी-काॅंग्रेस सोबत आघाडी करत सत्ता स्थापन केल्यामुळे राणा पाटलांची मंत्री होण्याची इच्छाही अपुर्ण राहिली. आता पुन्हा राज्यात सत्तांतर होवून शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाले. मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत, आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता राणा पाटलांना मंत्रीपद देत ताकद देण्याचा प्रयत्न होतो का? याकडे देखील त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

परंतु लोकसभेचा उमेदवार म्हणून जर भाजप राणापाटील यांच्याकडे पाहत असेल तर मग त्यांना औटघटकेचे मंत्रीपद देतील का? हा देखील मोठा प्रश्न आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात राणापाटील व ओमराजे निंबाळकर यांच्यातून विस्तव देखील जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही महिन्यांपुर्वी झालेल्या बैठकीत या दोघांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसमोरच खडाजंगी झाली होती. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येपासून या दोन घराण्यामधील वैर टोकाला गेले आहे.

त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत जर पुन्हा हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात लढले तरी या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. भाजपने शिक्षक मतदारसंघासह हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून राणापाटील यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. भाजप त्यांना बळ देण्याच्या प्रयत्नात आहेच. २०१४ च्या पद्मसिंह पाटील विरुद्ध प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला असता शिवसेनेने ही जागा तब्बल २ लाख ३५ हजारांच्या मताधिक्याने जिंकली होती.

परंतु २०१९ मध्ये हे मताधिक्य १ लाखांनी घटले होते. ओमराजे निंबाळकर यांच्या मागे शिवसैनिकांची व तरुण कार्यकर्त्यांची मजबुत फळी आहे. तर राणापाटील यांच्याकडे जिल्ह्यावर गेल्या कित्येक वर्षापासून असलेल्या सत्तेचा अनुभव. त्यामुळे २०२४ मध्ये अपेक्षेप्रमाणे राणापाटील व ओमराजे निंबाळकर यांचा सामना झाला, तर त्यात कोण बाजी मारेल? याकडे राज्याचे लक्ष असेल.