बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केली, रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई, १८/०७/२०२२: राज्यात भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक नगरसेवकांसह नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असतानाच आता शिवसेनेच कट्टर समर्थक रामदास कदम यांनीही पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केल्याचे त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळाले आहे. ‘आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम झाले नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले. ‘विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला मातोश्रीवर बोलवून घेतले. मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणथीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोलले तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मीडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचे कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही,’ असेही कदम यांनी पत्रात नमूद केले आहे.
‘मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक्ष शिवसैनिक याचा साक्षीदार आहे. २०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत सरकार बनवत होतात त्यावेळीही मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवले. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्यावेळी माझं ऐकलं नाही. याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे,’ असं रामदास कदम म्हणाले आहेत.