जीवे मारण्याच्या धमकीवरून राम शिंदे यांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप
कर्जत, ३० मे २०२३: चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे.
पवार यांच्या एका कार्यकर्त्याने राम शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास जीवे मारण्याचा धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कर्जत जामखेडमधील राजकीय वातावरण तापले आहे. असे राजकारण कर्जत-जामखेडमध्ये चालणार नाही, अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे.
भाजप आमदार राम शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओनंतर राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:हून तो व्हिडिओ शेअर केला आहे. आमदार रोहित पवार यांचा संपर्क देत घरात घुसून मारण्याचे चॅलेज दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
राम शिंदे पुढं म्हणाले की व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर आमचे नगरसेवक अमित चिंतामणी यांना फोन करुन सांगितले की ‘शिस्तीत राहा, जुळवून घे, रोहित पवारांशी पंगा घेऊ नका’, असा फोन केला होता. चार दिवसांपूर्वी रोहित पवारांनी चौंडीत पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले होते की बघून घेईन, त्यामुळे याचाही काही संदर्भ आहे का? हे देखील तपासलं पाहिजे, असे राम शिंदे म्हणाले.
व्हिडिओमध्ये रोहित पवारांचं नाव आहे आणि कर्जत-जामखेडमध्ये अशाप्रकारचे राजकारण करणं अतिशय गंभीर आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस तपास करतील, असे राम शिंदे यांनी सांगितले. घरात घुसून मारण्याच्या धमक्या माजी मंत्र्याला आणि आमदाराला देणं हे अतिशय गंभीर आहे, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाने राम शिंदे यांना धमकी दिली. याप्रकरणी अमित अरुण चिंतामणी (रा. जामखेड) जामखेड पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर सुभाष गवसणे (रा. पिंपळगाव उंडा, जामखेड) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणाऱ्याने सोशल मीडियाद्वारे लाइव्ह करत धमकी दिली. तो आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे समजते. या धमकीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.