खालापूर टोलनाक्यावर राज ठाकरेंचा राडा – “बांबू लावण्याचा दिला सज्जड दम”
मुंबई, ८ जानेवारी २०२४: राज्यातील टोल नाक्याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या राज ठाकरे आज थेट खालापूर टोल नाक्यावर स्वतः उतरले आणि त्यांनी ठाकरे शैलीत टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना हिसका दाखवला. त्यांनी या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता रिकामा करून दिला.
पुण्यावरून मुंबईला येताना ट्रॅफिक जॅममुळे राज ठाकरे टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या सर्व गाड्या सोडल्या. या ट्रॅफिकमध्ये एक अँब्युलन्सही अडकली होती, राज ठाकरेंच्यामुळे तिला रस्ता मिळाला.
राज ठाकरे त्यांचा पिंपरीतील कार्यक्रम संपवून मुंबईला येत होते. त्यावेळी खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम असल्याचं त्यांना दिसलं. त्या ठिकाणी पाच किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची माहिती होती. त्यानंतर राज ठाकरे स्वतः टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला.
यलो लाईनच्या बाहेर जर गाड्या असतील तर त्यांना सोडण्याचा नियम असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचं त्यांनी निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी टोल नाक्यावर उतरून स्वतः सर्व ट्रॅफिक क्लिअर केलं. या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका अँब्युलन्सला त्यांनी रस्ता करून दिला.
मुंबई पुणे हायवेवर आज रविवारमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामध्ये एक अँब्युलन्सही अडकली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी टोल नाक्यावर स्वतः उतरून सर्व गाड्या सोडल्या. त्यानंतर टोल अधिकाऱ्यांनाही चांगलंच धारेवर धरून नियमांचे पालन का होत नाही याचाही जाब विचारला.
टोल नाक्यावरील लुटीवर या आधीही राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी त्यावर राज ठाकरेंची भेट घेऊन त्यासंबंधित नवीन नियमांची माहिती दिली. असं असलं तरी त्याची अंमलबजावणी होत नाही याची प्रचिती आज स्वतः राज ठाकरेंना आली. त्यानंतर मात्र राज ठाकरेंचा पारा चढला आणि त्यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
राज ठाकरे यांना खालापूर टोल नाक्यावर जो अनुभव आला त्यावरून टोल नाक्याच्या व्यवस्थापनाकडून नियमांचे पालन केले जात नाही हे उघड झालं आहे. या संदर्भात राज ठाकरे यांना राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिलं होतं. आता या प्रश्नावर सोमवारपासून मनसे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.