राज ठाकरेंचा एकनाथ शिंदे अजित पवारांना महत्त्वाचा सल्ला, अमृता फडणवीस यांनी घेतली ठाकरे यांची मुलाखत
मुंबई, २६ एप्रिल २०२३: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनपेक्षित रित्या होणाऱ्या गडबडी मुळे कधी काय घडेल याची शाश्वती नाही. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेऊन बऱ्याच विषयांवर त्यांना बोलते केले. यामध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. एका वाक्यात उत्तरे देताना मुलाखतीमध्ये ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जपून रहा असा सल्ला दिला. तर अजित पवार यांना बाहेर जेवढे लक्ष ठेवता तेवढेच काकांकडेही लक्ष ठेवा असा टोला लगावला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. हे दोघं एका मंचावर आले आणि मुलाखत घेतली तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय महाराष्ट्राने घेतला. विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची प्रतिमा डॉनसारखी असल्याचं म्हणत ही प्रतिमा तयार केली की तुमच्या कामातून झाली असा थेट प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनीही स्पष्टपणे उत्तर दिलं. ते बुधवारी (२६ एप्रिल) लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अमृता फडणवीस राज ठाकरेंना प्रश्न विचारत म्हणाल्या, “प्रभावी विरोधकाला लोक घाबरतात. मात्र, प्रशासक लोकांना घाबरायला लागतो. राज ठाकरेंची आजही एकदम डॉनसारखी प्रतिमा आहे. म्हणजे चांगल्या डॉनची प्रतिमा आहे. उद्योग क्षेत्र, चित्रपटसृष्टी असो किंवा राजकारणी असो, आजही राज ठाकरेंना घाबरतात. ही प्रतिमा तुम्ही जाणूनबुजून तयार केली की तुमचं व्यक्तिमत्त्व, आंदोलनं, तुमच्यावरील दाखल गुन्हे यामुळे घाबरतात?”
या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “प्रतिमा ही काही तयार केलेली गोष्ट नसते. तयार केलेली गोष्ट ही तात्पुरती असते. मुळात मी तसा असेन. डॉन नाही, पण तसा मी ‘नो नॉनसेन्स’वाला माणूस आहे. मी परखडपणे बोलत असेल, स्पष्टपणे बोलत असेन, पण उद्धटपणे बोलत नाही. मात्र, अनेकदा लोकांना स्पष्टपणा आणि उद्धटपणातील फरक कळत नाही. असं असलं तरी मी स्पष्टपणे बोलतो. मला राग फार पटकन येतो, पण तो राग तितक्याच पटकन मावळतोही. मला कित्येकदा आमच्या पक्षातील लोक म्हणतात की, जरा कमी स्पष्ट बोला,” असं राज ठाकरेंनी नमूद केलं.
अमृता फडणीसांचे प्रश्न, राज ठाकरेंची उत्तरं
यावर अमृता फडणवीसांनी तुम्ही स्पष्ट बोलता असं म्हणाले, मग मी काही लोकांची नावं घेईन त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
अमृता फडणवीस – एकनाथ शिंदे
राज ठाकरे – जपून राहा
अमृता फडणवीस – देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे – वरती संबंध नीट ठेवा
अमृता फडणवीस – अजित पवार
राज ठाकरे – मला ५ तारखेच्या माझ्या रत्नागिरीतील सभेत सविस्तर बोलायचं आहे. एका वाक्यात बोलायचं नाही, पण अजित पवार बाहेर जेवढं लक्ष देत आहेत तेवढंच त्यांनी काकांकडेही लक्ष द्यावं.
अमृता फडणवीस – उद्धव ठाकरे
राज ठाकरे – उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी, ते स्वयंभू आहेत.
अमृता फडणवीस – आदित्य ठाकरे
राज ठाकरे – तेच ते.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप