विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर
मुंबई, ९ डिसेंबर: विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
फडणवीस काय म्हणाले?
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या १२ कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता, तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला, या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल शंका नाही, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
राजकारणात उतरता काळ झाला की अशा पदांवर नेत्यांची वर्णी लावली जाते. असा एक सर्वसाधारण राजकीय समज आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छूक होते. त्यांच्यासोबत मुंबईतून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेतेही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार, याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, राहुल नार्वेकर यांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांना कायद्याची जाण आहे. त्यामुळे नियमांवर बोट ठेवून काम कराव्या लागणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी साहजिकच राहुल नार्वेकर यांच्याकडेच भाजप नेतृत्त्वाचा कल आहे.
प्रशासकीय कामकाजासाठी योग्य
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली होती. याशिवाय राहुल नार्वेकर यांचा एकूण कल आणि प्रतिमा ही प्रशासकीय कामकाजासाठी अधिक योग्य असल्याचे सांगितले जात होतं. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन भाजप नेतृत्त्वाकडून राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बसवलं जाईल असं बोललं जात होतं.