पुणे: ठाकरे गटाकडून कोथरूडसह चार विधानसभा मतदारसंघावर दावा

पुणे, १९ ,ऑगस्ट २०२३: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहिली तर ठाकरे गटाला कोथरूड, हडपसर, वडगावशेरी आणि कसबा हे चार विधानसभा मतदारसंघ मिळाले पाहिजेत, या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो, अशी मागणी आज शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पुण्यात गटप्रमुखांचा मेळावा घेणार असल्याचे ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत मातोश्री येथे बैठक घेतली. यावेळी संपर्कप्रमुख सचिन आहिर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, विशाल धनवडे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी पुणे लोकसभेसह शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षबांधणीवर चर्चा केली.

गटप्रमुखांच्या नियुक्त्या, प्रभागनिहाय, विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा आढावा घेतला. सुमारे ७० टक्के नियुक्त्या झाल्या आहेत असे पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर उर्वरित नियुक्त्या आॅगस्ट महिनाअखेर पर्यंत पूर्ण करा आणि मतदारसंघनिहाय बैठका सुरू करा अशा सूचना केल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुण्यातील काही मोजके पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, पण बहुतांश कार्यकर्ते, माजी नगरसेवक हे आपल्यासोबत आहेत यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी झालेल्या चर्चेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी झाली नाही तर सर्व आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत, त्यादृष्टीने संघटनेची बांधणी केली जात आहे. जर आघाडी झाली तर कोथरूड, वडगावशेरी, हडपसर आणि कसबा हे चार विधानसभा मतदारसंघात आपली ताकद चांगली आहे, त्यामुळे या जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे मोरे यांनी सांगितले.

ठाकरेंनी दिली शाबासकी
गेल्यावर्षी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात झालेल्या हल्ल्याच्या आरोपाखाली ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी या शिवसैनिकांच्या हातातील शिवबंधन पोलिसांनी काढून टाकले होते. मोरे यांनी आता शिवबंधन बांधले तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अशी इच्छा व्यक्त केली होती. गेल्यावर्षभरात मोरे मातोश्रीवर अनेकदा गेले पण शिवबंधन बांधण्याचा योग आला नाही. आज उद्धव ठाकरे यांना ही बाब समजताच त्यांनी मोरे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून ‘असेच लढत रहा, मी सोबत आहे’, अशी यांनी शाबासकी दिली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप