पुणे: गणशोत्सवात अफजलखान वधाच्या देखाव्याला पोलिसांची परवानगी

पुणे, दि. २४/०८/२०२२- गणेशोत्सवात अफजल खान वधाच्या देखाव्याला अखेर कोथरूड पोलिसांनी परवानगी दिली आहे. संगम मित्र मंडळाकडून याबाबत पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित वधाच्या देखाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबत पुन्हा कोथरूड पोलिसांनी पत्र माघारी घेत मंडळाला वधाचा देखावा देण्यासाठी परवानगी दिली आहे.

 

गणेशोत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भाविकांना दाखविण्यासाठी अफजल खान याचा वध करणारा देखावा सादर करण्याची परवानगी संगम मित्र मंडळाने पोलिसांकडे केली होती. मात्र, वधाच्या हलत्या देखाव्यााला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. याबाबत मंडळाकडून वेळोवेळी पोलिसांकडे वध सादरीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर बुधवारी कोथरूड पोलिसांनी २० ऑगस्टला दिलेले पत्र मागे घेतले आहे. त्यानुसार गणेशोत्सवात अटींचा भंग होणार नाही, याची दक्षता मंडळाने घेण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.

 

“गणेशोत्सवात अफजल खानाचा वध हलता देखावा सादरीकरणासाठी संगम मित्र मंडळाने मागणी केली होती. त्यानुसार संबंधित मंडळाने कायदा सुव्यवस्था राखून नियम व अटींचे पालन करीत देखावा करावा अशी सूचना केली आहे.” – महेंद्र जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे