पुणे: आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी
पुणे, २५/०९/२०२२: आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ (वय ५६,रा. फेअर रोड, गोळीबार मैदान, कॅम्प,पुणे) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव,पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले. त्याने कधी २ लाख कधी ३ लाख तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी सांगितले की,बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्हयात आमदार माधुरी मिसाळ यांचे दिर दीपक मिसाळ याना खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठी असणारा मोबाइल नंबर वापरण्यात आला आहे.