पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा रेसकोर्स येथे होणार
पुणे, ता. २३/०४/२०२४: पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी स प महाविद्यालयाच्या मैदाना ऐवजी आता रेस कोर्स येथे सभा होण्यात असल्याचे भाजप तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभा स्थळात बदल करण्यात आलेले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडुन बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, पुण्यात मुरलीधर माेहोळ, शिरूर मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या या चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे शहर भाजपतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार भाजपने सभेची तयारी देखील सुरू केलेली होती.
नरेंद्र मोदी यांच्या सभेला किमान एक लाख नागरिक उपस्थित राहतील असे नियोजन भाजपतर्फे करण्यात आलेले असून, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, मनसे या घटक पक्षांना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सभेसाठी स. प. महाविद्यालयाचे मैदान लहान पडू शकते यामुळे आता जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता रेस कोर्सच्या मैदानावर ही सभा होणार आहे.
शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा २९ एप्रिल रोजी सभा महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी रेस कोर्स येथे घेण्यात येणार आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणा उपस्थित राहणार आहेत, गर्दीचे नियोजन करण्यासाठी सभा स्थळामध्ये बदल करण्यात आला आहे. मोदी यांच्या रोड शोच्या मार्गात बदल होऊ शकतो, या संदर्भात बुधवारी पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे.