प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीच्या प्रवेशाचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात

अमरावती, २७ डिसेंबर २०२३: देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडीने सोबत नाही घेतले तर सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास तयार आहे असा इशारा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर दोन दिवसांपूर्वीच दिला. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘‘प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावे ही आमच्या सर्वांची इच्छा आहे, तसे मी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांच्याशी बोललो आहे. ते निर्णय घेतली असे सांगितले. त्यामुळे आता आंबेडकरांच्या प्रवेशाचा निर्णय पूर्णपणे काँग्रेसच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीतले अनेक नेते वंचित बहुजन आघाडीला आपल्याबरोबर घेण्यास इच्छूक आहेत. परंतु, कुठल्याही पक्षाने अद्याप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यासंबंधी चर्चा केलेली नाही. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा मोठा तिढा आहे. अनेक पक्ष एकत्र आल्याने राज्या-राज्यांत जागा वाटप करताना सर्वच पक्षांना काही जागांचा त्याग करावा लागणार आहे. त्याचबरोबर, मतविभाजन टाळण्यासाठी स्थानिक पक्षांनाही हाताशी घ्यावं लागणार आहे. वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. त्यांची ठाकरे गटाबरोबर युती आहेच. परंतु, काँग्रेसबरोबर असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे हे गणित जुळत नसल्याचं दिसतंय. यावर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, वंचितने प्रतिसाद दिला तर त्यांना आघाडीत घेतलं पाहिजे, अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात मतांचं विभाजन टाळता येईल. महाविकास आघाडी, प्रकाश आंबेडकर आणि इतर समविचारी पक्ष महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात. तसेच जागावाटपात वंचितला सामावून घेता येईल.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही वेळापूर्वी अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत कधी सामावून घेणार? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “मला माहिती नाही. पण, इंडिया आघाडीच्या बैठकीत मी मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधून त्यांच्यासह निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असं सांगितलं आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकरांबरोबर एकत्र पुढे जाऊ.”