बंडखोर पटेलांनी काढला शरद पवारांसबोत फोटो, चर्चेला उधाण
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेत पवारांना दगा दिला. त्यानंतरही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. पण आज नवी दिल्ली येथे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांनी नव्या संसद भवनात फोटो काढला. तो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
विशेष अधिवेशनाद्वारे जुन्या संसदेला निरोप देऊन नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी सर्व खासदारांनी हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्रित खास पोझमध्ये फोटो काढला. हा फोटो प्रफुल्ल पेटल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
पटेल यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यांपैकी एक फोटो हा राज्यसभेच्या चेंबरमधील असून या ठिकाणी पटेल आणि पवार हे दोघेच या फोटोत आहेत. तर दुसरा एक फोटो नव्या संसद भवनातील कॅफेटेरियातील आहे.
या कॅफेटेरियात बसून राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार शरद पवार, वंदना चव्हाण यांच्यासह बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल हे तिघे शेजारी बसलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत इतरही काही खासदार आहेत यामध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या देखील फोटोत दिसत आहेत.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी हे दोन फोटो शेअर करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, “नवीन संसद भवनातील आजचा ऊर्जेप्रमाणं उत्साहित दिवस. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्यानं आणखीनच खास बनला आहे. त्याचबरोबर कॅफेटेरियात मित्रांसह स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेत आहोत. खरोखरच आजचा दिवस लक्षात ठेवण्यासारखा आहे”.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप