जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नको – रवींद्र धंगेकर यांची टीका

पुणे, १ मे २०२४ : महागाई का कमी केली नाही, यावर ‘ते’ बोलणार नाहीत. बेरोजगारी का वाढतेय, याकडे ‘ते’ दुर्लक्ष करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत, असे विचारल्यानंतर ‘ते’ कानावर हात ठेवतात. महिलांवर अत्याचार का वाढले आहेत, असे म्हणल्यानंतर ‘ते’ डोळे बंद करतात. असे हे अंधे-मुके आणि बहिरे सरकार आपण गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे. असे सरकार देशातील जनतेला नकोय, असे अशी खरमरीत टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदी यांच्या भाषणात नवीन काहीही नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचे भाषण पूर्ण होत नाही. विकासावर ते बोलत नाहीत.वाढत्या महागाई, बेरोजगारीवर गप्प राहतात. वर्षाला २ कोटी रोजगार देवू, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देवू, सर्व टोल नाके बंद करू, पेट्रोल, गॅस स्वस्त करू… अशी खोटी आश्वासने देवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारची जुमलेबाजी आता जनतेला चांगलीच समजली आहे.

केंद्र सरकारने पन्नास रुपयांचे पेट्रोल ११० रुपयांवर नेले. ४०० रुपयांचा गॅस १२०० रुपयांवर नेला. त्यामुळे सर्वसामान्यांना काय हाल सोसावे लागत आहेत, हे मोदींनी कधी रस्त्यावर उतरून पाहिले नाही. सभा घेणे, भाषणे ठोकणे म्हणजे लोकांमध्ये मिसळणे, असे होत नाही. गेल्या १० वर्षात ते एकदाही लोकांमध्ये मिसळले नाहीत. इतकेच काय या १० वर्षात एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. अनेक चॅनेल त्यांनी विकत घेतले असले तरी पत्रकारांच्या प्रश्नांना ते आजही घाबरतात, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केल्यामुळे हजारो छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. तर अनेकांनी आत्महत्या केल्या. आपल्या देशात कोरोना येण्याआधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला ‘जनतेची काळजी घ्या, कोरोना जगात सर्वत्र पसरत आहे’, असे पत्राद्वारे कळवले होते. पण, केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, देशातील लाखो लोक मृत्युमुखी पडले. या दहा वर्षांत केवळ धार्मिक तेढ वाढवण्याचे काम या सरकारने केलेले आहे. आता यांना जनताच योग्य ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.