औटी पलटले; निलेश लंकेंना धक्का

अहमदनगर, २ मे २०२४: लोकसभा निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यात तटस्थ राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सांगितले. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना त्यांनी आपण खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, तालुक्यातील आमचे कार्यकर्ते रामदास भोसले, श्रीकांत पठारे, अनिल शेटे आणि प्रियंका खिलारी यांनी एकत्रित हा निर्णय घेतला आहे. पाठिंबा देताना आम्ही दोन्ही उमेदवारांचे विचार, कामाची पद्धत आणि अनुभव यांचा विचार केला. विखे पाटील यांनी पाच वर्षे चांगले काम केले आहे. त्यांना आणखी पाच वर्षे संधी मिळाली, तर या अनुभवाचा फायदा घेत ते चांगले काम करू शकतील. त्यातून एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल असे आमचे मत झाल्याचे औटींनी सांगितले.

मी पंधरा वर्षे आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी माझा पराभव होऊनही कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिले. माझ्याशी प्रामाणिक राहिले. आता त्या सर्वांना मी आवाहन करत आहे की, आजपासून आपण सर्वजण डॉ. विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रीय होणार आहोत. कोणाला काही शंका असतील तर थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन औटी यांनी केले आहे.

लंके यांच्या कार्यपद्धतीबद्दल औटी यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार झाल्यानंतर गावपातळीवरील राजकाराणातील नको इतका हस्तक्षेप, अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल चुकीचे बोलणे, तालुक्यातील घटक पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेणे या गोष्टी पटत नसल्याचे औटी म्हणाले. सध्या सुरू असलेला प्रचार भरकटत असल्याकडे लक्ष वेधून औटी म्हणाले की, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर खासदारांना बोलावे लागते, त्यांचा अभ्यास करावा लागतो. सध्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते उमेदवारापर्यंत कोणीही या विषयावर भूमिका मांडताना दिसत नाही. अशाच अनेक प्रश्नांवर उमेदवारांनी भूमिका मांडणे अपेक्षित असते, मात्र तसे होताना दिसत नाही, असेही औटी म्हणाले.