राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस, मविआचे खासदार भाजपच्या संपर्कात: चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

मुंबई, ११ डिसेंबर २०२४: महाविकास आघाडीतील काही आमदार-खासदार अस्वस्थ असून, ते आपली अस्वस्थता आमच्याकडे व्यक्त करीत असून, अनेकजण भाजपाच्या संपर्कात आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, की आमच्या पक्षांचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून, पक्षांकडून पाठबळ मिळत नाही, मतदारसंघांतल्या परिस्थितीविषयी बैठकांचे आयोजन केले जात नाही, अशीही संपर्कात असलेल्यांच्या तक्रारी आहेत.

ऑपरेशन लोटस संदर्भात बावनकुळे म्हणाले, की तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआयचा वापर केला जातो, हे महाविकास आघाडीच्या लोकांचे नेहमीचे रडगाणे आहे. मात्र, मोदीजींनी केलेल्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी, देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या पक्षात कोणी आले तर, त्यांचे स्वागत आहे.

मारकडवाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत त्यांनी अशी टीका करणे अयोग्य आहे. त्यांना पार्टीकडून समज देण्यात येईल, असे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करून समन्वयाने योग्य निर्णय घेईल. आम्ही जनतेला जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याला आमचे सध्या प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जनतेने काठावर सांभाळले आहे. अतिशय कमी मतांनी ते विजयी झाले. आपल्याकडे जनतेने पाठ का फिरवली याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत. ज्या काँग्रेस नेत्याने लाडकी बहिण योजना बंद करावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. ते अनिल वाडपल्लीवार हे त्यांच्या निवडणुकीचे प्रमुख होते, अशी अनेक कारणे काँग्रेससाठी मारक ठरली.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएमबाबतचे यांचे आक्षेप फेटाळले असून, तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले आणि हरता तेव्हा चांगले नाही, असे म्हणत फटकारले आहे. त्यामुळे आताही ते न्यायालयात गेले तरी, काही होणार नाही. जनतेने आपल्याला नाकारले हे सत्य स्वीकारून विरोधकांनी पराभवाचे आत्मचिंतन केले पाहिजे.लोकसभा निवडणुकीत पार्टी म्हणून आम्ही देखील कमी पडलो होतो. परंतु, त्यानंतर आम्ही पुन्हा लोकांमध्ये गेलो. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केले. पुन्हा संघटना बांधणी केली.

ईव्हीएमबाबत फेक नरेटिव्ह
मारकडवाडी गावातील मतदानाची आकडेवारी मी मांडली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून ईव्हीएम बाबत फेक नरेटिव्ह चालवला जात असून, ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आपण निवडणुकीत कुठे कमी पडलो, याचा शोध महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यायला हवा.