आता ४०० खासदार निवडून आणायची जबाबदारी आमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोदींवर स्तुतीस्तुमने

मुंबई, १२ जानेवारी २०२४: लोकसभा निवडणुकीनंतर देशात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. आणि विरोधक ते सहन करु शकणार नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरच लोकसभा निवडणुकीचा एकप्रकारे नारळ फोडला आहे. देशात अब की बार ४०० पार या नाऱ्याला मजबूत करण्यासाठी आपली देखील मोठी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे देशात अबकी बार मोदी सरकार आणि महाराष्ट्रात अबकी बार 45 पार हा संकल्प घेऊन आम्ही पुढे जात असल्याचे सांगत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमटीएचएल प्रकल्पाचं उद्धाटन होत आहे. आज देशातला सर्वाधिक लांबीचा २२ किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रीजचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला. या एमटीएचएल सागरी सेतूचं भूमीपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आणि आज या ब्रीजचं उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देशामध्ये जशी मोदींची गॅरंटी चालते तसा हा ब्रीज देखील आणखी मजबूत झाला आहे. हा सी ब्रीज २२ किलोमीटरचा आहे. अनेक मोठमोठ्या भूकंपाचे धक्के झेलणयाची ताकद देखील या ब्रीजमध्ये आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा भूकंप होणार आहे, आणि तो विरोधी पक्षांना सहन होणार नाही, असा थेट इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. शिवडी न्हावा शेवा हा फक्त एक मार्ग नाही तर विजयाकडं घेऊन जाणारा विकासाचा महामार्ग आहे.

अन्याय अत्याचार करणाऱ्या अहंकारी रावणाचा संहार करण्यासाठी प्रभू श्रीरांमाच्या सेनेनं समुद्रावर सेतू बनवला. त्याचप्रमाणे या सागरी सेतूच्या निर्माणानं अहंकारी लोकांचा अहंकार धुळीस मिळणार आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील विकासप्रकल्पांसाठी भूमीपूजन आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदींना बोलावतो. तेव्हा तेव्हा ते आमचा उत्साह वाढवण्यासाठी येतात, वेळ देतात. त्यामुळे विकासविरोधी लोकांच्या पोटात दुखतं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

पंतप्रधान मोदी देशभरात सद्भावना आणि सर्वांगिण विकासाचा पूल बांधत आहेत. त्यामुळे अब की बार ४०० पार या नाऱ्याला मजबूत करण्यासाठी आपली देखील मोठी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्यासमक्ष शब्द देतो की, अबकी बार मोदी सरकार आणि महाराष्ट्रात अबकी बार ४५ पार हा संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचं सरकार बनण्याआधी महाराष्ट्राचा विकास खुंटला होता, सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम सुरु झालं आहे.