मविआच्या गाडीला ‘ना चाक ना ब्रेक’ पण ड्रायव्हर सीटसाठी वाद – धुळ्यातील सभेत मोदींचा प्रहार

धुळे, ८ नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला. आज धुळ्यातील सभेत पीएम मोदींनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली. राज्यातील महाविकास आघाडीची अवस्था सध्या गाडीला ना चाक ना ब्रेक अशी झाली आहे. या गाडीच्या ड्रायव्हर कोण होणार यावरूनह वाद सुरू आहेत, अशी खोचक टोला मोदींनी लगावला.

मोदी पुढे म्हणाले, मी महाराष्ट्राकडे काही मागितलं त्यावेळी राज्यातील जनतेनं भरभरून दिलं. २०१४ मधील निवडणुकीत मी धुळ्यात आलो होतो. त्यावेळी मी भाजप सरकारचा आग्रह केला होता. तर तुम्ही १५ वर्षांचं राजकीय कुचक्र तोडून भाजपला विजयी केलं होतं. आता मी पुन्हा धुळ्यात आलोय. आता येथूनच मी प्रचार मोहिमेला सुरुवात करतोय.

मागील अडीच वर्षांत राज्याच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती थांबवणार नाही. पुढील पाच वर्षात राज्याच्या प्रगतीला नव्या उंचीवर नेऊ. सुशासन फक्त महायुतीनेच दिलं आहे. महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके ना ब्रेक. तर चालकाच्या सीटवर बसण्यासाठी वाद होतो. सगळीकडून वेगवेगळे हॉर्नचे आवाज येत आहेत असा खोचक टोला मोदींनी लगावला.

आम्ही जनतेला ईश्वराचं रुप मानतो. त्यांच्या सेवेसाठीच आलो आहोत. पण काहीचं मत लोकांना लुटण्याचं आहे. असा विचार करणारे महाविकास आगाडीचे लोक सत्तेत आले तर विकास ठप्प करतात. मविआचं धोक्याचं अडीच वर्षांचं सरकार तुम्ही पाहिलंत. यांनी आधी सरकार लुटलं नंतर तुम्हालाही लुटत होते. या लोकांनी मेट्रो योजना ठप्प केली. समृद्धीत महामार्गाच्या कामात अडचणी आणल्या. आघाडीवाल्यांनी राज्याच्या विकासाच्या प्रत्येक योजना थांबवल्या ज्यातून राज्यातील जनतेचं भविष्य उज्ज्वल होणार होतं. पण येथे महायुतीचं सरकार आल्यानंतर चित्रच बदललं आहे.

महायुतीच्या वचननाम्याचं कौतुक करताना मोदी म्हणाले, राज्यात भाजपा महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. मी आज महायुतीचं अभिनंदन करू इच्छितो. महायुतीने राज्याला नवी समृद्धी देणारा वचननामा जारी केलाय. त्याची आज भरपूर चर्चा होतेय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी शानदार वचननामा तयार केलाय. महायुतीचा वचननामा विकासाची वाढेल गती राज्याची होणार हमखास प्रगती. राज्याच्या भविष्याचा रोडमॅप या वचननाम्यात आहे. महायुतीचा वचननामा विकसित राज्य आणि देशाचा आधार बनेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

महिलांच्या योजनांची चेष्टा
राज्य आणि केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांची चेष्टा काँग्रेसचे लोक करत होते. पण आज त्याच योजना महिला सशक्तीकरणाचा पर्याय बनल्या आहेत. राज्य सरकारनेही महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत याचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि त्याच्या आघाडीला हे सहन होत नाही. महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेची देशात चर्चा होत आहे. पण काँग्रेस या योजना बंद करण्यासाठी षडयंत्र रचत आहे. ह्यांचे लोक योजना बंद करण्यासाठी थेट कोर्टात गेले. काँग्रेसला सत्ता मिळाली तर सर्वात आधी या योजनेला बंद करतील. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेने या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. काँग्रेस आणि आघाडीवाले महिलांप्रती अभद्र भाषेचा वापर करत आहेत. कुणीच त्यांच्या या कृत्यांना माफ करणार नाही, अशी टीका मोदींनी केली.