सर्व्हेचे नो टेंशन, जनतेचा पाठिंबा मोदीजींनाच – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

नागपूर, २६ ऑगस्ट २०२३: देशातील विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रामध्ये जोरदार झटका बसणार असल्याची शक्यता समोर आली आहे. ४८ पैकी केवळ २० जागा भाजपला मिळतील असा दावा या सर्वेक्षणामध्ये करण्यात आल्याने भाजपाने चिंतेचे वातावरण आहे. तर महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे आम्हाला टेन्शन नाही जनतेचा पाठिंबा हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे असा दावा व्यक्त केला आहे.

भाजपचे घर चलो अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदार संघाचा प्रवास करीत असताना, सर्वसामान्य नागरिक मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मत द्यायला तयार असल्याचे दिसत असून, या समर्थनामुळे कुठल्याही सर्व्हेची आम्हाला चिंता वाटत नाही, जनतेचे समर्थन मोदीजींना मिळणार असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

शनिवारी ते नागपूर (कोराडी) येथे माध्यमांशी संवादात म्हणाले, भाजपला जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विजय वडेट्टीवार हे नवीनच विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना मीच काँग्रेसमधील मोठा नेता असल्याचे दाखवावे लागते. भीतीपोटी कॉंग्रेसचे नेते काहीही विधाने करत सुटले आहेत. भारतीय जनता पक्षाचा इतिहास गौरवशाली आहे. आम्हाला जन्मजात काही मिळालं नाही. काँग्रेस बरखास्त करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते; त्याबद्दलचे चिंतन त्यांनी करावे अशीही टीका त्यांनी केली.

बावनकुळे म्हणाले, आज भारत चंद्रावर पोहचला ही अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिल्याने ही मोहीम यशस्वी झाली. शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणे ही नैतिकता आहे.पण विरोधी नेत्यांना ते देखील सहन होत नाही. भाजपाची संस्कृती आणि संस्कार आम्हला माहिती आहे. राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून आम्ही काम करीत आहोत.

देशमुख अटींचा भंग करताहेत

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, अनिल देशमुख सध्या जमानतीवर बाहेर आहेत. त्यांनी ऑर्डर बरोबर वाचलेली दिसत नाही. जमानतीच्या अटीशर्तीचा ते भंग करत आहेत. अनिल देशमुख आमचे मित्र आहेत, मी शरद पवार यांना काहीही बोललो नाही, त्यांच्या भूमिकेवर बोललो, शरद पवार, सुप्रिया सुळे बोलतात, ते म्हणतात फूट पडली नाही. त्यावर बोललो, शरद पवार यांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप