कोणत्याही बदमाशाला पक्षात स्थान नाही: गद्दार आमदारावर नाना पटोले संतापले
मुंबई, ६ ऑगस्ट २०२४: विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप केला जात आहे. आता यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना इशारा दिला आहे. “कोणत्याही बदमाशाला पक्षात स्थान नाही. चुकीला माफी नाही”, अशा शब्दात गद्दारी करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या हायकमांडकडून आता निर्णय घेण्यात आला आहे की, कोणत्याही बदमाशांना, यापुढे पक्षात स्थान दिलं जाणार नाही. काही लोक फक्त व्यापारासाठी पक्षात येतात. मात्र, याबाबतची स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा व्हीप न जुमानता महायुतीच्या उमेदवारांना काँग्रेसच्या काही आमदारांनी मतदान केलं असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडून अहवाल मागवला होता तर क्रॉस वोटिंग करत महायुतीला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यानंतर आता काँग्रेस पक्षाशी दगाबाजी करणाऱ्यांचा आगामी विधानसभेला पत्ता कट करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर बोलताना आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सूचक वक्तव्य करत इशारा दिला आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, “कोणालाही अभय दिलेलं नाही. ज्यांची कोणाची नाव यामध्ये आयडेंटिफाय झालेली आहेत, त्या कोणालाही अभय दिलेलं नाही. कारण चुकीला माफी नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या हायकमांडकडून घेण्यात आलेली आहे”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवळपास पाच ते सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत महायुतीला मदत केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत काँग्रेसकडून अहवालही मागवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आता काँग्रेस हायकमांड येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना धक्का देण्याची शक्यता आहे.