ईव्हीएम वर तेव्हा मला कोणी साथ दिली नाही आता तुम्ही बोंबलत बसा राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

नाशिक, २ फेब्रुवारी २०२४ : मनसाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला राम मंदिर मराठा आरक्षण लोकसभा निवडणुका इडीची कारवाई यासह विविध विषयावर त्यांनी भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, ज्यावेळेस मी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले तेव्हा मला कोणीच साथ दिली नाही मदत करायला कोणी आलेले नाही, आता तुम्ही बोंबलत बसा अशी टीका ठाकरेंनी केली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने गेले काही महिने पक्षातील पदाधिकारी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन महाराष्ट्र सैनिकांशी बोलत आहेत, त्या त्या मतदारसंघाची चाचपणी करत आहेत.. कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत ह्याचा आढावा घेत आहेत. आणि ही प्रक्रिया सर्व राजकीय पक्ष करत असतात. ह्यांच्याकडे केंद्र आणि राज्याची सत्ता आहे ते जर करत असतील तर आम्ही का करू नये?

अयोध्येला जाणार हे नक्की पण सध्या तिकडे प्रचंड गर्दी आहे. मी असं ऐकलं की रोज १० लाख लोकं भेट देत आहेत. तिकडचं सगळं सुस्थितीत आलं की जाईन. तोपर्यंत रामाचं दर्शन घ्यायचं असलं तर नाशिकचं काळाराम मंदिर आहेच.

मराठी शाळा बंद होण्याचं प्रमाण महाराष्ट्रभर वाढतं आहे, त्यावर मागे शासनाला एक उपाय सुचवला होता की सेमी-इंग्रजी शाळा सुरु करा. कारण हल्ली पालकांना पण असं वाटत असतं की आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी यायला हवं, त्यासाठी त्यांचा अट्टहास हा इंग्रजी शाळेसाठी असतो. अशावेळेस जर शाळेत इंग्रजी आणि मराठी दोन्हीला योग्य महत्व देणारं शिक्षण मिळणार असेल तर पालक तो पर्याय नक्की निवडतील.

ईडीला हाताशी धरून सुडाचं राजकारण जे सुरु आहे, किंवा एकूणच सत्तेचा वापर करून जे राजकारण केलं जात आहे त्याचा फटका कधी ना कधी भाजपला पण बसणार आहेच ना. कारण भाजप पण काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. ते जेंव्हा सत्तेच्या बाहेर जातील तेंव्हा नवीन येणारे दामदुपटीने ह्यांचा हिशोब करतील. आज भाजपवाले म्हणतात की इंदिराजींच्या काळात पण नाही का सत्तेचा दुरुपयोग झाला. पण म्हणून तुम्ही करायचा ह्याला काहीच अर्थ नाही.
आज भारतीय राजकारण जसं विस्कटलं आहे त्याला फक्त मतदारच फक्त वठणीवर आणूं शकतं. जर एखाद्या सरकारने एखादी गोष्ट बरी केली म्हणून तुम्ही त्यांच्या दहा चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार असाल तर परिस्थिती जशी आहे तशीच राहणार.

ईव्हीएमचा मुद्दा मी जेंव्हा घेतला तेंव्हा मला कोणीही साथ दिली नाही, आता इतर विरोधातील पक्ष बोंबलत आहेत. बसा बोंबलत. मोठ्या प्रमाणावर मतदान तेव्हाच होतं जेव्हा मतदारांच्या मनात कशाच्या तरी विरोधातील राग खदखदत असतो. आता जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातून मतदान किती होतं हे बघावं लागेल. आजपर्यंत निवडणुका प्रश्नांवर झाल्या… उत्तरावर निवडणूक होण्याची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे राममंदिर झालं म्हणून मी खुश आहे पण मी भाजपचा मतदार आहे असं होत नाही. तेंव्हा काय होतंय बघावं लागेल.

मराठा आरक्षणाच्या लढ्यात आरक्षणाची मागणी सोडून सगळ्या मागण्या मान्य झाल्या. जरांगे पाटील ह्यांना मी जेंव्हा भेटायला गेलो होतो तेंव्हा मी सांगितलं होतं की हा विषय तांत्रिक आहे, कायदेशीर अनेक अडचणी आहेत, त्यात केंद्र सरकारने काही निर्णय घ्यायला हवं. हे सगळं इतकं सोपं नाही. पण हे माझ्या मराठा बांधवांना कोणी सांगणार आहे का? तुम्ही मागच्या वेळेला मोर्चे काढलेत, ह्यावेळेला काढलेत, त्यातून हाताला काहीच लागलं नाही. आरक्षण खरंच मिळालं का ? कोणीतरी स्वतःच राजकारण साधण्यासाठी तुम्हाला भडकवणार असेल तर काय उपयोग? जरांगे पाटीलांनी त्या दिवशी वाशीत विजयोत्सव साजरा केला, कशाचा विजयोत्सव? आणि जर विजय मिळाला आहे मग आता परत उपोषणाला का बसताय ?
टोलला माझा विरोध नाही. माझी मागणी आधीपासून इतकीच आहे टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी जी आपल्याकडे नाही. जगभरात टोल असतोच पण आपल्याकडे नक्की किती टोल भरलाय ह्याचा हिशोब लोकांना दिला जात नाही ह्याचा मला राग आहे. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या समोर मध्यंतरी टोलनाक्यांवर जी आकडेवारी गोळा केली आहे ती सादर करणार आहे. लोकांच्या पैशानी जर टोलचा कंत्राटदार गब्बर होणार असेल किंवा राजकीय पक्षांच्या निधीत भर पडणार असेल तर माझा विरोध आहे. पत्रकारांना टोलच्या आंदोलनानंतर फुटलेल्या काचा तुम्हाला दिसतात पण तुम्हाला टोलचा झोल का नाही दिसत?
महात्मा गांधी, गोडसे, नेहरू ह्यांच्यावर कितीवर्ष बोलणार आहोत आपण. ही माणसं गेली, त्यांच्यावर बोलून काय होणार आहे? आज महागाईवर कोणी बोलणार नाही, शेतकऱ्यांवर कोणी बोलणार नाही. फक्त एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. बस करा आता हे सगळं आणि मूळ प्रश्नांकडे या, असे राज ठाकरे यांनी सांगितले.